जागेअभावी रस्त्यावरच बाजार

By Admin | Updated: September 20, 2016 02:08 IST2016-09-20T02:08:28+5:302016-09-20T02:08:28+5:30

डांगे चौकात भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे दर रविवारी वाहतूक कोंडीचा उच्चांक पाहण्यास मिळत आहे.

Market on the road to be awake | जागेअभावी रस्त्यावरच बाजार

जागेअभावी रस्त्यावरच बाजार


थेरगाव : येथील डांगे चौकात भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे दर रविवारी वाहतूक कोंडीचा उच्चांक पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाहनचालकांची आणि पादचाऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे.
डांगे चौक हा शहरातील महत्त्वाचा आणि गजबजलेला चौक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते़ औंध,रावेत, चिंचवड, हिंजवडी, तसेच पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग अशा विविध ठिकाणी जाणारे रस्ते या चौकात मिळतात. या सर्व ठिकाणी जाणाऱ्या वाहनांची संख्याही जास्त आहे.
याच चौकात रविवारचा मोठा आठवडे बाजार भरतो. या बाजारादिवशी अनेक विक्रेते रस्त्यावरच दुकान थाटतात. त्यामुळे वाहनचालकांना या गर्दीत मार्ग काढताना चांगलीच कसरत करावी लागते. परिणामी वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी होते. गेल्या महिन्यात अतिक्रमण कारवाईच्या विरोधात व्यावसायिकांनी रास्ता रोको केला. अधिकाऱ्यांनी रस्त्यावर दुकाने न थाटण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर दोन आठवडे बाजार भरला नसल्याने वाहतूक सुरळीत होती़ मात्र, गेल्या आठवड्यापासून पुन्हा बाजार रस्त्यावरच भरत आहे़ डांगे चौकातील चारही रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे़
आयटी हब, शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे, गृहप्रकल्प, पुणे शहराला जोडणारा औंध रस्ता आणि पिंपरी-चिंचवडनगरीकडे जाणारा मार्ग यामुळे डांगे चौकाला दळणवळणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे़ त्यामुळे वाहनांची आणि पादचाऱ्यांची वर्दळ रात्री उशिरापर्यंत असते़ त्यामुळे या चौकातील अतिक्रमण आणि वाहतूककोंडीवर कायमची उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
वाहतूक पोलीस यंत्रणेवर याचा प्रचंड ताण पडत आहे. याच चौकात औंधकडे जाणाऱ्या बसथांब्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांकडून अतिक्रमण होत आहे. त्यामुळे या थांब्यावर पीएमपी थांबवणे वाहनचालकांना कठीण होत आहे. बसथांब्याच्या पुढे बस थांबवावी लागत असल्याने वृद्ध नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच बस पकडण्याच्या घाईत अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या रिक्षांवर कारवाई करून बस स्थानके प्रवाशांसाठी उपलब्ध करावीत.
सकाळी व संध्याकाळी हिंजवडीमधील अनेक कंपन्या भरण्याची व सुटण्याची वेळ असते. या वेळेत वेगवेगळ्या कंपन्यांच्या बसगाड्या या चौकातून जात असतात. तसेच लहान मोटारींचीही वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. वाहतूक पोलीस या चौकात उपस्थित नसल्याचे पाहून अनेक वाहनचालकांकडून सिग्नलचे उल्लंघन केलेले पहायला मिळते.
या चौकातून सांगवी-किवळे बीआरटी मार्ग जातो. इतर वाहनचालकांनी सिग्नलचे उल्लंघन केले तर बीआरटी बसगाड्यांना अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंचवडकडे जाणाऱ्या बसगाड्यांसाठी असणारा बसथांबा रिक्षा आणि हातगाड्यांनी गिळंकृत केला होता. नागरिकांनी केलेल्या तक्रारींमुळे या बसस्थानकाने मोकळा श्वास घेतला आहे. अशीच कारवाई इतर बसस्थानकाबाबत करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
>मागणी : मंडईसाठी स्वतंत्र जागा द्यावी
डांगे चौकातील भाजीमंडईचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहे. पुनावळे, रावेत, किवळे, ताथवडे, वाकड, हिंजवडी या गावांमधून शेतकरी आपला शेतीमाल विकण्यासाठी डांगे चौकातील आठवडेबाजारामध्ये आणत असतो. या आठवडे बाजाराला उपनगरातील लोक मोठ्या संख्येने भाजी खरेदीसाठी येत असतात. मात्र, स्वतंत्र भाजीमंडई नसल्यामुळे भाजी विक्रेत्यांना रस्त्यावरच दुकान थाटावे लागत आहे. अनेक वेळा रावेतकडे जाणारा मार्गच या बाजारामुळे जवळ जवळ बंद होतो. पुलाच्या बाजुने रावेत, किवळेकडे जाणाऱ्या वाहनांना या गर्दीतूनच वाट काढावी लागते. जास्त गर्दी असल्याने अनेक वेळा वाहनांचा धक्का नागरिकांना लागून वादा-वादीचे प्रसंगही ओढवतात. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष घालून या समस्येचा गांभीर्याने विचार करावा व आठवडे बाजारासाठी स्वतंत्र भाजीमंडईसाठी जागा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून मुख्य रस्त्यावरील वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण
होणार नाही.

Web Title: Market on the road to be awake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.