नाशिकच्या बाजारसमितीत व्यापारी-शेतकरी आमने-सामने
By Admin | Updated: June 3, 2017 14:13 IST2017-06-03T14:13:03+5:302017-06-03T14:13:03+5:30
काही व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला असता शेतकऱ्यांनी त्यांना कडाडून विरोध करत सुरूवातीला विनंती केली;मात्र व्यापाऱ्यांनी दाद न दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक

नाशिकच्या बाजारसमितीत व्यापारी-शेतकरी आमने-सामने
नाशिक : सकाळी अकरा वाजता नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संपाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी काही व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला असता शेतकऱ्यांनी त्यांना कडाडून विरोध करत सुरूवातीला विनंती केली;मात्र व्यापाऱ्यांनी दाद न दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. संपाची दिशा ठरविली जात असताना व नाशिकच्या शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारे संप मागे घेतला नसताना बाजारसमितीत व्यवहार सुरू करू नये, असे शेतकरी यावेळी सांगत होते. दरम्यान, पोलीसांनी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांची धरपकड सुरू केली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. यामुळे बैठकीलाही विलंब झाला. पोलिसांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्यामुळे जोरदार घोषणाबाजी शेतकऱ्यांनी सुरू केली. यावेळी तात्पुरत्या स्वरुपात ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांना पोलीसांनी नंतर सोडून दिले. याप्रसंगी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडून शेतमालाची विक्री हाणून पाडली. मिरच्या, डांगर, गाजर, रस्त्यावर फेकून निषेध नोंदविला. पोलिसांनी यावेळी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थीती नियंत्रणात आली आणि बैठकीला सुरूवात झाली.