मराठवाडा सुखावला
By Admin | Updated: September 19, 2015 02:47 IST2015-09-19T02:47:34+5:302015-09-19T02:47:34+5:30
विदर्भ आणि छत्तीसगडच्या भागावरील कमी दाबाचा पट्टा तीव्र झाला असून, विदर्भ आणि लगतच्या भागाकडे सरकल्याने राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे.

मराठवाडा सुखावला
मुंबई/पुणे : विदर्भ आणि छत्तीसगडच्या भागावरील कमी दाबाचा पट्टा तीव्र झाला असून, विदर्भ आणि लगतच्या भागाकडे सरकल्याने राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणातील बहुतांश ठिकाणी मुसळधार तर उर्वरित ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. दमदार पावसामुळे दुष्काळाने होरपळलेला मराठवाडा सुखावला आहे.
पुढील दोन दिवस पाऊस असाच सक्रिय राहणार असून, कोकणात अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
दुष्काळाच्या झळा बसत असलेल्या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये गुरुवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली; तर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातही जोरदार वृष्टी झाली. परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांना पूर आला आहे. पुरामुळे जालना आणि परभणीत जनावरे दगावली. अनेक झाडे उन्मळून पडली. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आतापर्यंत विभागात ५१.१२ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
जालन्यात कुंडलिका व सीना नदी दुथडी भरून वाहत आहेत. लाडसावंगी येथे दुधना नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागल्यामुळे पात्रालगतचे मंदिर पाण्याखाली गेले, दोन तरुण कळसाजवळ अडकले होते. त्यांना वाचविण्यासाठी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट फोर्सच्या जवानांची मदत घेण्यात आली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
खान्देशात अतिवृष्टी
खान्देशात गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले. अनेक नद्यांना पहिल्यांदाच पूर आला आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. फत्तेपूर (ता. जामनेर) येथे डोहात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाला. हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडले आहेत.
साताऱ्यात बरसला
सातारा शहरासह महाबळेश्वर, खंडाळा, शिरवळ, माण, खटाव परिसरात पाऊस झाला.
गंगापूरमधून विसर्ग
पहाटेपासून धुुवाधार पावसाने हजेरी लावल्याने शुक्रवारी गंगापूर धरणातून फक्त ४२ दशलक्ष घनफूट पाणी सोडावे लागले. पर्वणीला पाणी सोडण्यासाठी मज्जाव करणाऱ्या याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
नगरला संततधार
अहमदनगरमध्ये वादळी वाऱ्यासह गुरुवारी झालेल्या पावसाने अनेक घरांची पडझड होऊन संसार उघड्यावर आले़ शुक्रवारी जिल्ह्यात सर्वदूर संततधार सुरू होती़ जिल्ह्यात १५ मिलिमीटर पाऊस झाला.