मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार तरी कधी ?

By Admin | Updated: May 2, 2017 22:29 IST2017-05-02T22:29:47+5:302017-05-02T22:29:47+5:30

यंदाच्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

Marathi will never get classical language status? | मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार तरी कधी ?

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार तरी कधी ?

मयूर देवकर/ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 2 - यंदाच्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठीजनांच्या पदरी निराशा पडली. महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त लागोपाठ तिसऱ्यांदा हुकला. त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळणार तरी कधी? असा संतप्त सवाल मराठी सारस्वतांकडून विचारला जात आहे.

अभिजात दर्जाच्या मुद्द्याची गत आता लांडगा आला रे आलाप्रमाणे झाली असून, दरवर्षी जागतिक मराठी दिन किंवा महाराष्ट्र दिन जवळ येताच सर्वांना याचे वेध लागतात. सर्व पुराव्यांसह अहवाल सादर केल्यानंतरही केवळ राजकीय अनास्था व उदासीनतेमुळे हा मुद्दा गेली चार वर्षे औपचारिकतेच्या सोपस्कारामध्ये अडकला आहे. राज्य शासन गठीत अभिजात मराठी भाषा समितीने तयार केलेल्या अहवालास अकादमीच्या भाषा समितीने एकमताने सकारात्मक लेखी अभिप्राय देऊन २०१५ साली तो केंद्र सरकारकडे वर्ग केला. दर्जा देण्याच्या विरोधात वकील आर. गांधी यांनी मद्रास उच्च न्यायालयात दाखल के लेल्या याचिकेमुळे दोन वर्षांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी हा निर्णय प्रलंबित होता. गेल्या मार्च महिन्यात मद्रास उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आणि महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून केंद्र सरकार दर्जाची घोषणा करेल, अशी आस निर्माण झाली होती.

केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असूनही मराठीला दर्जा मिळवण्यास एवढा विलंब होतो म्हटल्यावर पराकोटीची राजकीय अनास्था याखेरीज दुसरे काय म्हणणार, असे निराशायुक्त उद्गार अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे यांनी लोकमतशी बोलताना काढले. संपूर्ण भारतभर मराठी माणसे विखुरलेली आहेत. आपापल्या परीने ही लाखो मंडळी आजही मराठी जिवंत ठेवून आहेत. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर भाषा संवर्धनासाठी आर्थिक पाठबळ मिळेलच परंतु या सर्व लोकांना जोडण्यास खूप मदत होईल. तसेच विविध बोलींचे कोश करण्याचे काम पूर्ण होऊ शकेल. मराठी भाषिकांचा आत्मविश्वास वाढेल हे वेगळे सांगायला नको, असे ते म्हणाले.

दिल्लीवर मोर्चा काढा!
राजकीय यंत्रणेवर दबाव निर्माण करण्यासाठी आता जनसामान्यांनाच पुढाकार घेण्याची गरज आली आहे. साहित्य संस्था, बुद्धिवंत, भाषाप्रेमी आणि माध्यमांनी एकत्र येऊन शासन दरबारी आवाज चढवला तर कदाचित काही फरक पडेल. दिल्लीत जाऊन मोर्चा काढला पाहिजे, असे प्रा. पठारे म्हणाले. एवढे मुहूर्त चुकवले आता बस! उगीच एखाद्या औचित्याची वाट पाहणे सोडा आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा घोषित करावा. त्यासाठी चांगल्या मुहूर्ताची प्रतीक्षा करण्याची वेळ आता सरून गेली, अशी प्रतिक्रिया कवी दासू वैद्य यांनी व्यक्त केली.

छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी महाराष्ट्राला नेहमीच केंद्राशी झगडावे लागले आहे. आपले शासनकर्तेही यामध्ये कमी पडतात. आता सर्वसामान्य जनतेनेच त्यांना जाब विचारला पाहिजे.
- प्रा. रंगनाथ पठारे, ज्येष्ठ साहित्यिक

सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करूनही आमच्या हक्काची मागणी मिळू नये याला काय म्हणायचे? जबरदस्तीने दर्जाची मागणी नाही करीत आहोत. विधायक मार्गानेच पण जलद दर्जा हवा.
- दासू वैद्य, कवी

Web Title: Marathi will never get classical language status?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.