मांसाहारी जेवण करतात म्हणून मराठी नाट्यनिर्मात्याला मारहाण
By Admin | Updated: July 17, 2015 19:47 IST2015-07-17T19:42:40+5:302015-07-17T19:47:24+5:30
घरात मांसाहारी जेवण करतात या कारणावरुन ख्यातनाम नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांच्या कुटुंबीयांना सोसायटीतील अन्य सदस्यांकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

मांसाहारी जेवण करतात म्हणून मराठी नाट्यनिर्मात्याला मारहाण
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - घरात मांसाहारी जेवण करतात या कारणावरुन ख्यातनाम नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांच्या कुटुंबीयांना सोसायटीतील अन्य सदस्यांकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या सोसायटीमधील बहुसंख्य रहिवासी हे गुजराती व मारवाडी समाजातील असून या घटनेमुळे मुंबईतील मराठी - अमराठी वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.
मदर्स डे, यु टर्न, वन रुम किचन अशा प्रसिद्ध नाटकांचे निर्माते गोविंद चव्हाण हे दहिसरमधील बोना व्हेन्चर या इमारतीमध्ये राहतात. या इमारतीतील बहुसंख्य रहिवासी हे गुजराती - मारवाडी समाजातील आहेत. चव्हाण कुटुंबीयांच्या घरी मांसाहारी जेवण तयार होते या संशयावरुन सोसायटीतील काही सदस्य त्यांच्या घरी गेले. या मुजोर सदस्यांनी चव्हाण यांच्या दाराजवळ घाणेरडे पाणी, नासकी अंडी टाकली. या प्रकारानंतर चव्हाण यांची मुलगी सोसायटीतील सदस्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी जात असताना तिला व तिच्या आईला मारहाणीचा प्रयत्नही करण्यात आला. या सोसायटीत पुन्हा मांसाहार करायचा नाही अशी धमकीही त्यांना देण्यात आली. याप्रकरणी गोविंद चव्हाण यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
चव्हाण यांच्या मारहाणीनंतर मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसे व शिवसेना समर्थकांकडून या प्रकारावर सोशल मिडीयावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. तर नितेश राणे यांनी गोविंद चव्हाण यांची भेट घेत घटनेची सविस्तर माहिती घेतली. आता शब्दांपेक्षा कृतीच बोलेल असं सूचक ट्विटही त्यांनी या भेटीनंतर केले आहे.