मराठी टॅलेंटला माध्यमाची गरज!
By Admin | Updated: November 20, 2014 02:51 IST2014-11-20T02:51:21+5:302014-11-20T02:51:21+5:30
मराठीमध्ये अनेक चांगले विषय सलगपणे येत आहेत. यावरून मराठीमध्ये किती टॅलेंट भरलेले आहे, याची जाणीव होते. मात्र ही कला लोकांपर्यंत पोहचण्यासाठीचे योग्य माध्यम मिळत नाही.

मराठी टॅलेंटला माध्यमाची गरज!
पुणे : मराठीमध्ये अनेक चांगले विषय सलगपणे येत आहेत. यावरून मराठीमध्ये किती टॅलेंट भरलेले आहे, याची जाणीव होते. मात्र ही कला लोकांपर्यंत पोहचण्यासाठीचे योग्य माध्यम मिळत नाही. मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट प्रदर्शित होतात मात्र सामान्य माणसाला ती वेळ ‘आॅड’ ठरते. मराठीला प्राईम टाईम मिळाला तरच तो चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यत पोहचेल. याबाबत कायदा केला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नाही, अशी खंत अभिनेता अजय देवगण याने व्यक्त केली.
अजय आता मराठी चित्रपटाच्या निर्मितीमध्ये उतरला आहे. ‘विटी-दांडू’ चित्रपटाच्या प्रमोशनासाठी पुण्यात आला असता त्याने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अभिनेते रविंद्र मंकणी, अशोक समर्थ, दिग्दर्शक विकास कदम उपस्थित होते. अजय म्हणाला, मराठीमध्ये दर्जेदार कथानक येत असल्यानेच हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंत मराठीमध्ये येण्यास इच्छुक आहेत किंवा निर्मिती क्षेत्रात उतरत आहेत. बॉलिवूडचे सिनेमे हे केवळ मनोरंजनात्मक असतात, नाहीतर मग थेट कलात्मक असतात. मात्र मराठीमध्ये या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातल्याचे दिसते. मराठी आणि हिंदीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॅलेन्ट आहे, ते एकमेकांना पूरक ठरेल, अशा पद्धतीने काही प्रोजेक्टस भविष्यातही मला करायला आवडतील. मराठीमध्ये मला एकट्याला किंवा काजोलसह काम करायला आवडेल, मात्र तसे कथानक असायला हवे.
‘विटी दांडू’विषयी अजय म्हणाला, या चित्रपटाचा लेखक विकास कदम आणि मी एकत्र काम करीत आहेत. विकासने ‘विटी दांडू’ची कथा लिहिल्यानंतर मला ऐकवली आणि त्या कथेच्या मी प्रेमातच पडलो. मराठीत पदार्पण करण्यासाठी यापेक्षा दर्जेदार दुसरी कथा होऊच शकत नाही, असा विचार मनात आला आणि मी तेव्हाच या चित्रपटाचा अविभाज्य घटक होण्याचा निर्णय घेतला.