...तर मराठी टक्का निश्चित वाढेल
By Admin | Updated: September 5, 2016 03:26 IST2016-09-05T03:26:17+5:302016-09-05T03:26:17+5:30
१०-१२ वी पासून विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केली तर प्रशासकीय परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचा मराठी टक्का निश्चित वाढेल
_ns.jpg)
...तर मराठी टक्का निश्चित वाढेल
ठाणे : १०-१२ वी पासून विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केली तर प्रशासकीय परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचा मराठी टक्का निश्चित वाढेल, असे ज्येष्ठ पत्रकार आणि ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे संचालक प्रकाश बाळ यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
मराठा मंडळातर्फे सरस्वती शाळेच्या सभागृहात मार्च २०१६ च्या दहावी, बारावीच्या परीक्षेतील ८० व अधिक टक्क्यांनी उत्तीर्ण झालेल्या ठाणे शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. मराठी विद्यार्थ्यांनी या प्रशासकीय सेवांकडे पगाराची शाश्वती असलेल्या नोकरीचे साधन इतकाच दृष्टिकोन न ठेवता याकडे करिअर म्हणून पाहण्याची नितांत गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना प्रशासकीय परीक्षा, त्यांची पूर्वतयारी, देशसेवेची संधी याबाबतीत विस्तृत माहिती देताना ते म्हणाले की, संपूर्ण देशात ही एकमेव संस्था आहे, जिथे हे शिक्षण विनामूल्य दिले जाते. तसेच येथील वाचनालय अद्ययावत आहे. जिथे जगभरात लिहिली गेलेली पुस्तके महिनाभरात वाचनासाठी उपलब्ध होतात. फक्त येथे वसतिगृह नाही. त्यामुळेच ठाणे-मुंबई परिसरातील विद्यार्थ्यांनी या संस्थेचा जास्तीतजास्त लाभ घेतला पाहिजे. लेखिका माधुरी ताम्हाणे यांनी ‘जगावं कसं आणि वागावं कसं’ या विषयावर मार्गदर्शन केले. १०-१२ वी पर्यंत शिक्षणाच्या विविध शाखांना प्रवेश घेण्यासाठी गुणांच्या टक्केवारीचे महत्त्व आहे. परंतु, त्यानंतरच्या आयुष्यात यशस्वी करिअर करण्यासाठी आणि जीवनातील अत्युच्च ध्येय गाठण्यासाठी शिस्त, सातत्य, वक्तशीरपणा, नम्रपणा या गुणांचे महत्त्व टक्क्यांइतकेच आहे. किंबहुना जास्त आहे. टक्क्यांची हवा डोक्यात जाऊ देऊ नका. एखादा छंद जोपासा, ज्यायोगे नेहमी ताजेतवाने राहाल आणि अभ्यासाचा ताण मेंदूवर येणार नाही.
>परदेशात गेलात तरी मातृभूमीला विसरू नका
शिक्षण अथवा पैसे कमवण्यासाठी तुम्ही भावी आयुष्यात परदेशात गेलात तरी आपल्या मातृभूमीला आणि आईवडिलांना विसरू नका. संधी मिळताच येथे परत या, असा सल्ला मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांनी दिला. मंडळाचे चिटणीस राजेंद्र साळवी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन अपर्णा साळवी, विनय परब, सयाजी मोहिते यांनी केले. रोख पारितोषिके, भेटवस्तू आणि सन्मानप्रमाणपत्र देऊन पावणेदोनशे विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला.