मलेशिया, हाँगकाँगमध्ये मराठी दिन जल्लोषात
By Admin | Updated: March 21, 2017 17:28 IST2017-03-21T17:28:27+5:302017-03-21T17:28:27+5:30
मलेशिया, हाँगकाँगमधील महाराष्ट्र मंडळाने मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला

मलेशिया, हाँगकाँगमध्ये मराठी दिन जल्लोषात
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - मलेशिया, हाँगकाँगमधील महाराष्ट्र मंडळाने मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अन् विदेशात कार्यरत असणाऱ्या मराठी माणसांनी मातृभाषा संवर्धनाचे अनोखे उपक्रम घेतले.
हाँगकाँग महाराष्ट्र मंडळाने कै़ लक्ष्मीबाई टिळक यांच्या 'स्मृतीचित्रे' या अजरामर आत्मचरित्रातील निवडक उताऱ्यांचे वाचन करून मराठी दिन वैशिष्ट्यपूर्णरित्या साजरा केला़ लक्ष्मीबार्इंनी अगदी रंजक, गोष्टीवेल्हाळ पद्धतीने आपल्या आयुष्यातील घटनांचे कथन पुस्तकात केले आहे़ सोपी, सरळ, सहज समजणारी भाषा, छोटी वाक्ये व संवादातून प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्याचे कौशल्य आणि त्यावरचे मिश्किल भाष्य या सोहळ्यात ऐकायला मिळाले़ हाँगकाँगमधील मराठी भाषिक 'वाचनमात्रे' हा उपक्रम घेतात़ मुग्धा रत्नपारखी यांच्या या वाचनमात्रे संकल्पनेला सुनील कुलकर्णी यांनी साथ दिली आहे़ त्यांच्या समवेत मनोज कुलकर्णी, नितीन राजकुंवर, अरुणा सोमन, दिपाली भाटवडेकर हेही वाचनात सहभागी झाले़
हाँगकाँग महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष मनोज कुलकर्णी म्हणाले, मंडळ दोन वर्षांपासून वाचनमात्रे उपक्रम घेत आहे़ प्रत्येकजण आपल्या आवडलेल्या पुस्तकातील निवडक उताऱ्यांचे वाचन करतो़ हा प्रवास साने गुरुजी, विजय तेंडूलकर, व़पूक़ाळे असा आहे़ या माध्यमातून भाषा जोपासण्याचा एक सकारात्मक प्रयत्न केला जात आहे़
दरम्यान, मलेशिया येथील महाराष्ट्र मंडळाने क्वालालंपूर येथे साहित्यसंध्या हा कथाकथन व काव्यवाचनाचा कार्यक्रम घेतला. कुसुमाग्रज, वसंत बापट, बा़भ़बोरकर आदींच्या कवितांचे वाचन झाले़ स्वरचित कविता व कथांचेही वाचन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष संजय दीक्षित यांनी केले़ सचिव डॉ़अमेय हसमनीस, संदेश सावर्डेकर, बिनाका सावंत यांनी साहित्यसंध्याच्या उत्कृष्ट आयोजनासाठी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)