दिलीप मोहितेविटा (जि. सांगली) : नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू शहरात हिंसाचाराने कळस गाठला असून आंदोलनाची झळ सोने-चांदी व्यवसायासाठी काठमांडूत स्थायिक झालेल्या मराठी गलाई बांधवांनाही बसली आहे; परंतु या हिंसाचारापासून शहरातील सुमारे एक हजाराहून अधिक मराठी बांधव व त्यांचे कुटुंब सुरक्षित आहेत. मात्र, हिंसाचारामुळे सर्व व्यवसाय बंद करून मराठी बांधव घरीच थांबले आहेत.नेपाळ सरकारच्या विरोधात तेथील तरुणांनी गेल्या चार ते पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन अधिक तीव्र होताना दिसत आहे. आंदोलकांनी सरकारी मालमत्तेसह काही मोजक्या खाजगी व्यावसायिकांना लक्ष केले असले, तरी सर्वसामान्य नागरिक व छोटे व्यावसायिक यांना कोणताही त्रास दिला नसल्याचे सांगण्यात येते.खानापूर, आटपाडी, तासगाव, माण, खटाव या तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील हजाराहून अधिक मराठी बांधव कुटुंबीयांसह सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त नेपाळच्या काठमांडूसह अन्य शहरात स्थायिक झाले आहेत. आटपाडी तालुक्यातील य. पा. वाडी, आवळाई, माडगुळे, आटपाडी, दिघांची, तडवळे, खानापूर तालुक्यातील साळशिंगे, भेंडवडे, वाळूज, खटाव तालुक्यातील निमसोड, सोलापूर जिल्ह्यातील अकलूज यासह अनेक गावांतील मराठी गलाई गेल्या अनेक वर्षांपासून गलाई व्यवसाय करीत आहेत. काठमांडूतील न्यू रोड, चाबील, बाणेश्वर, कोटेश्वर, पाटण, काळीमाती या परिसरात मराठी बांधवांचा व्यवसाय असून न्यू रोड या मुख्य बाजारपेठेत मराठी बांधवांची व्यवसायाची दुकाने आहेत. मात्र, या भागात आंदोलनाची कोणतीही झळ बसली नाही; परंतु या आंदोलनामुळे मराठी बांधवांची सर्व दुकाने बंद ठेवली असून सर्व मराठी बांधव सुरक्षित आहेत. या आंदोलनामुळे काठमांडूत स्थायिक असलेल्या मराठी गलाई बांधवांचे खानापूर, आटपाडी तालुक्यातील गावाकडील नातेवाईक दररोज आपल्या तेथील लोकांच्या संपर्कात आहेत.
नेपाळच्या काठमांडूत सुरू असलेले आंदोलन हे तेथील सरकारच्या विरोधात आहे. त्यामुळे आंदोलकांनी सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारे वेठीस धरले नाही. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काठमांडूच्या सराफ पेठेतील मराठी बांधवांचा व्यवसाय बंद असला तरी नेपाळमध्ये असलेले सर्व मराठी गलाई बांधव सुरक्षित आहेत. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी काळजी करू नये. - पोपट (शेठ) चव्हाण, मराठी गलाई बांधव, काठमांडू (नेपाळ).