‘इफ्फी’मध्ये मराठी चित्रपटांची मेजवानी
By Admin | Updated: November 20, 2014 18:24 IST2014-11-20T18:11:16+5:302014-11-20T18:24:49+5:30
तब्बल ११ चित्रपट : ‘एलिझाबेथ एकादशी’ने इंडियन पॅनोरमाचा प्रारंभ

‘इफ्फी’मध्ये मराठी चित्रपटांची मेजवानी
संदीप आडनाईक -पणजी -येथील ४५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ११ मराठी चित्रपटांची मेजवानी चित्रपट रसिकांना मिळणार आहे. इंडियन पॅनोरमा विभागात दाखविण्यात येणाऱ्या चित्रपटांमध्ये फीचर फिल्म विभागात सात, नृत्य विभागात एक आणि नॉन फिचर फिल्म विभागात तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे.दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाद्वारे इंडियन पॅनोरमा विभागातील चित्रपटांना प्रारंभ होणार आहे. बहुचर्चित डॉ. प्रकाश बाबा आमटे : द रिअल हिरो हा समृध्दी पोरे यांचा चित्रपटही इफ्फीचे आकर्षण राहणार आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे यांच्या भूमिका आहेत. ‘अ रेनी डे’ हा आणखी एक चित्रपट सर्वांचे लक्ष वेधून घेईल.‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटाच्या ध्वनीलेखनासाठी आॅस्कर मिळविलेल्या रस्सूल पकुटी यांचे ध्वनीलेखन असलेल्या राजेंद्र तालक यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आहे. दिग्दर्शक श्रीहरी साठे यांच्या ‘एक हजाराची नोट’ या चित्रपटात उषा नाईक आणि संदीप पाठक यांची भूमिका आहे.
याशिवाय लोकमान्य : एक युगपुरुष या ओम राऊत दिग्दर्शित चित्रपटात सुबोध भावे, समीर विद्ध्वंस, अंगद म्हसकर, चिन्मय मांडलेकर यांच्या भूमिका आहेत. ‘किल्ला’ या अविनाश अरुण यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपटही उल्लेखनीय असेल. महेश लिमये यांचा ‘यलो’ चित्रपटही आकर्षण असेल. नृत्य विषयाला वाहिलेल्या भारतीय चित्रपट विभागात व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला ‘पिंजरा’ चित्रपट दाखविण्यात येईल. नॉन फिचर विभागात विजू माने यांचा ‘एक होता काऊ’, रवी जाधव यांचा ‘मित्रा’ आणि प्रसन्ना फोंडे यांचा ‘विठ्या’ हे मराठी चित्रपट दाखविण्यात येतील.