नववर्षाच्या शुभेच्छापत्रातून ‘मराठी’ गायब
By Admin | Updated: December 31, 2014 01:37 IST2014-12-31T01:37:41+5:302014-12-31T01:37:41+5:30
‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी’ हा मराठीबाणा फक्त कवितेपुरताच मर्यादित राहिला की काय,

नववर्षाच्या शुभेच्छापत्रातून ‘मराठी’ गायब
विक्री घटली : कंपन्यांनी नवीन कार्डचे डिझाईन तयार केलेच नाही
नागपूर : ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी’ हा मराठीबाणा फक्त कवितेपुरताच मर्यादित राहिला की काय, असा प्रश्न पडला आहे. कारण, यंदा नवीन वर्षाच्या शुभेच्छापत्रामधील ‘मराठी’च गायब झाली आहे. मराठीचे संदेशपत्र खरेदी करणारे कमी झाल्याने कंपन्यांनी उत्पादनच घटविले आहे. मराठीचा अभिमान बाळगणाऱ्यांसाठी हा मोठा धक्काच आहे.
स्वदेशी कंपनीने मराठीतील पहिले शुभेच्छापत्र १९८४-१९८५ साली बाजारात आणले. आकर्षक मुखपृष्ठ, हृदयाला जाऊन भिडणारे काव्य आणि स्नेहाचा स्पर्श यामुळे ही शुभेच्छापत्रे हातोहात विक्री होऊ लागली. भाषेचा हा मार्केट फंडा लक्षात घेऊन बहुराष्ट्रीय कंपन्यांनी १९९७ मध्ये इंग्रजीसोबत मराठी शुभेच्छापत्रे बाजारात आणली. २०११ पर्यंत इंग्रजीच्या बरोबरीने नव्हे, तर त्याहून अधिक मराठी संदेशपत्रे विक्री होत असत. मात्र, नंतर हळूहळू मराठी संदेशपत्रांच्या विक्रीला ग्रहण लागणे सुरू झाले. यंदा एकाही कंपनीने नवीन डिझाईन बाजारात आणले नाही.
कार्ड उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंग्रजी ग्लोबल भाषा आहे. भारतच नव्हे तर विदेशातही मुंबई व दिल्ली येथून मोठ्या प्रमाणात इंग्रजीचे कार्ड निर्यात होतात. मात्र, मराठीचे कार्ड पुणे व मराठवाड्यातच जास्त विकले जात होते. आता त्यातही मोठी घट आल्याने नवीन डिझाईन तयार करून विक्री करणे परवडत नसल्याने नववर्षाच्या शुभेच्छा देणारे मराठीतील शुभेच्छापत्रेछापली नाहीत. (प्रतिनिधी)
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
व्हॅटस् अॅप, फेसबुक, टिष्ट्वटरच्या जगातही इंग्रजी भाषेतील शुभेच्छापत्रांची मागणी टिकून आहे; पण मागणीअभावी मराठीचे शुभेच्छापत्र बाजारातून गायब होत आहे.‘पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरीच हाल सोसते मराठी’, या सुरेश भट यांनी आपल्या कवितेत मराठीचे जे दु:ख व्यक्त केले ते शुभेच्छापत्रांच्या उलाढालीतून सत्य पुन्हा एकदा समोर आले आहे.
यासंदर्भात राजस स्टेशनरीचे जयंत घारपुरे म्हणाले, मागील तीन वर्षांपासून मराठी शुभेच्छापत्रांचा खप कमी झाला आहे. दुसरीकडे इंग्रजीतील संदेशांना मागणी वाढली आहे. व्हॉटस् अॅप, मेसेजचा परिणाम शुभेच्छापत्रांवर नक्कीच झाला आहे; पण इंग्रजीच्या कार्डला आजही मागणी आहे. यंदा इंग्रजीतील कार्डचे नवनवीन डिझाईन बाजारात आले आहेत. मात्र, मराठीतील एकही नवीन कार्ड बाजारात आले नाही. मागणी खूप कमी झाल्याने आता तर बहुतांश विक्रेत्यांनीही मराठी शुभेच्छापत्र ठेवणे बंद केले आहे.