मराठी नगरसेवक पदांचा त्याग करतील
By Admin | Updated: June 30, 2015 00:24 IST2015-06-29T23:59:34+5:302015-06-30T00:24:30+5:30
किरण सायनाक : बेळगावात एकीकरण समितीचा महामेळावा; कर्नाटक सरकारच्या विरोधातील ठराव टाळ्यांच्या गजरात मंजूर

मराठी नगरसेवक पदांचा त्याग करतील
बेळगाव : सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाचा निकाल २०१६ मध्ये लागणार असून, महाराष्ट्र सरकारने दाव्याची संपूर्ण तयारी केली आहे. २०१६ पर्यंत निकाल लागला नाही तर मी आणि माझे नगरसेवक कोणत्याही पदाचा त्याग करण्यास तयार आहोत. आम्ही सदैव मराठी भाषिकांच्या पाठीशी राहणार आहोत, असे उद्गार बेळगावचे महापौर किरण सायनाक यांनी सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्यात बोलताना काढले.
कर्नाटक सरकारने सोमवारपासून सुवर्णसौधमध्ये पावसाळी अधिवेशनाला सुरुवात केली आहे. यापूर्वी कर्नाटक सरकार बेळगावात हिवाळी अधिवेशन दरवर्षी घेत होते. यावर्षी प्रथमच पावसाळी अधिवेशन घेऊन बेळगाववरचा हक्क सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला प्रत्त्युतर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठा मंदिर येथे महामेळावा आयोजित केला होता.
महामेळाव्याचे अध्यक्षस्थान मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार वसंतराव पाटील यांनी भूषविले होते.
व्यासपीठावर महापौर किरण सायनाक, उपमहापौर मीना वाझ, आमदार संभाजी पाटील,आमदार अरविंद पाटील, शहर समिती अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, निन्गोजी हुद्दार, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. हुतात्म्यांच्या प्रतिमांचे पूजनही महामेळाव्याच्या प्रारंभी करण्यात आले. बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करावा, मराठी भाषिकांना घटनेने दिलेले अधिकार द्यावेत, नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांचे अभिनंदन, कर्नाटक सरकार करीत असलेल्या बेकायदेशीर कृत्याचा निषेध, असे ठराव महामेळाव्याच्या प्रारंभीच टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले .
कर्नाटक सरकार बेळगावात घेत असलेल्या पावसाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महामेळावा आयोजित केला असून, कर्नाटक सरकार जेव्हा अधिवेशन भरवेल मराठी भाषिक त्याला विरोध करण्यासाठी आणि आपली ताकद दाखवून देण्यासाठी महामेळावा घेतील. कर्नाटक सरकार सातत्याने मराठी भाषिकांचे खच्चीकरण करून अन्याय करीत आहे. मराठी भाषिकांचे घटनात्मक अधिकार हिरावून घेतेले आहेत. घटनात्मक अधिकार मिळविण्यासाठीही प्रयत्न सुरूआहे, असे उद्गार माजी आमदार मनोहर किणेकर यांनी काढले. (प्रतिनिधी)
आमदारांचा सुवर्णसौधमध्ये सभात्याग
भगवे फेटे परिधान केलेल्या आमदार संभाजी पाटील, आमदार अरविंद पाटील यांनी पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ होताच सीमाप्रश्नासंबंधी घोषणा देऊन सुवर्णसौधमध्ये सभात्याग केला आणि महामेळाव्याला हजेरी लावली.
महामेळाव्याच्या स्थळी भगवे ध्वज लावण्यात आले होते. अनेक कार्यकर्त्यांनी भगवे फेटे परिधान केले होते. महामेळाव्याला महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील, माजी मंत्री जयंत पाटील यांनी महामेळाव्याला पाठिंबा दर्शवून सीमावासीयांच्या पाठीशी असल्याचा संदेश पाठवून दिला.