एक मराठा लाट मराठा,  गर्दीचा विक्रम मोडीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 05:00 AM2017-08-10T05:00:29+5:302017-08-10T05:03:01+5:30

आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह ‘एक मराठा...लाख मराठा’ अशी गर्जना करत, राज्याच्या कानाकोपºयातून मराठा क्रांती मोर्चासाठी बुधवारी मुंबईत मराठ्यांचा अक्षरश: जनसागर उसळला. आजवरच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढत उसळलेल्या या भगव्या लाटेमुळे मुंबापुरी काही काळ का होईना, थबकल्याची प्रचीती आली.

A Maratha wave Maratha, a crowded record! | एक मराठा लाट मराठा,  गर्दीचा विक्रम मोडीत!

एक मराठा लाट मराठा,  गर्दीचा विक्रम मोडीत!

Next

 - विश्वास पाटील 
मुंबई : भायखळ्याच्या वीर जिजामाता उद्यानातून निघालेला मराठा क्रांतीचा मूक जनसागर दुपारी आझाद मैदानावर धडकला; तेव्हा त्याने विराट रूप धारण केले होते. स्वयंशिस्तीचे अनोखे सामूहिक दर्शन घडविणाºया या मराठा मोर्चाने मुंबईत आतापर्यंत झालेल्या मोर्चांच्या गर्दीचे विक्रम मोडीत काढल्याची चर्चा होती.
आझाद मैदानात पोहोचल्यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. आम्ही आजपर्यंत शांततेत मोर्चे काढले, परंतु खवळलेला हा मराठा समाज यापुढे शांत राहणार नाही, त्याचा आता अंत पाहू नका, असा इशाराही या मोर्चाने सरकारला दिला. आमचा मोर्चा कुण्या जाती-धर्माच्या विरोधात नाही, असेही या वेळी आवर्जून सांगण्यात आले. ‘मावळा हाच नेता व तोच कार्यकर्ता’ या भावनेने हा समाज शिवरायांची शपथ घेऊन भगव्या झेंड्याखाली संघटित झाला. अतिविराट असा हा मोर्चा कोणतेही गालबोट लागू न देता, अत्यंत शांततेत व तितक्याच संयमाने पार पडला. मोर्चातील स्वयंशिस्त, काटेकोर नियोजन, स्वच्छता आणि विलक्षण शांतता पाहून मुंबईनगरी चकित झाली.
राजकीय पक्ष, नेते आणि संघटनांना बाजूला सारत, मराठा समाजातील युवक, युवतींनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चातील तरुणाईचा सहभाग म्हणूनच लक्षणीय ठरला. राज्य सरकारकडून आरक्षणासह अनेक मागण्या मान्य करून घेतल्यानंतर, समाजाच्या प्रश्नांसाठी हातात हात घालून लढण्याची नवी ऊर्जा व उमेद घेऊन हा मराठा मावळा आपापल्या गावी परतला.

मराठा समाजाच्या मागण्या
मराठा समाजाला आरक्षण द्या
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या
अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखावा
कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्या
शेतीमालास हमीभाव द्या, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा


मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा

- छत्रपती शाहू महाराज योजनेंतर्गत ३५ अभ्यासक्रमांसाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू करण्यात आली होती. आता ती ६०५ अभ्यासक्रमांसाठी लागू केली जाईल. किमान ६० टक्के गुण शिष्यवृत्तीसाठी अनिवार्य होते. आता ओबीसींप्रमाणे केवळ ५० टक्के गुणांचीच अट असेल.

- प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारले जाईल. प्रत्येक वसतिगृहासाठी ५ कोटींचे एकरकमी अनुदान.
बार्टीच्या धर्तीवर मराठा समाजासंदर्भात संशोधन करून, योजना तयार करण्याच्या अनुषंगाने सारथी संस्था सुरू करून त्यांना पुण्यात कार्यालय देण्यात आले आहे. डॉ. सदानंद मोरे हे त्याचे अध्यक्ष आहेत. संस्थेचे सक्षमीकरण करण्यात येत आहे.

- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला यापूर्वी राज्य सरकारने २०० कोटी निधी दिला होता. महामंडळामार्फत शेतकऱ्यांच्या ३ लाख मुलांना केंद्र शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. या योजनेला केंद्र सरकारने कालच मंजुरी दिली आहे. प्रशिक्षित मुलांना रोजगार सुरू करण्यासाठी १० लाख रुपयांचे कर्ज बँकेमार्फत देण्यात येईल व त्याचे व्याज सवलत योजनेतून महामंडळामार्फत भरण्यात येईल.

- मराठा कुणबी, कुणबी मराठा अशा काही जातींना आरक्षण मिळाले आहे. मराठा आणि इतरही समाजातील या जाती आहेत. त्यांना त्या प्रवर्गात घेण्यात आले आहे, पण त्यांना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येतात. अशा एकूण १८ जाती आढळल्या आहेत. त्यांना सुलभतेने जात प्रमाणपत्र मिळावे, याकरिता राज्य सरकार प्रयत्न करेल. रक्ताच्या नात्यामध्ये एका व्यक्तीची जातवैधता पडताळणी झाल्यानंतर, कुटुंबातील इतर सदस्याला पुन्हा जातपडताळणीसाठी जावे लागणार नाही, असा कायदा लवकरच राज्य शासन करेल.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: A Maratha wave Maratha, a crowded record!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app