मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले आहेत. शुक्रवारपासून मुंबईत मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाले आहे. हजारोंच्या संख्येने मराठा समाजातील आंदोलक मुंबईत दाखल झाल्याने दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. त्यात भाजपा आमदार संजय केनेकर यांनी मनोज जरांगेंना शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब असल्याचं खळबळजनक विधान करत आंदोलनावर टीका केली आहे.
भाजपा आमदार संजय केनेकर म्हणाले की, शरद पवारांचा एक सुसाईड बॉम्ब म्हणून जरांगेंकडे पाहिले जाते. खऱ्या अर्थाने हे नुकसान बुमरँग होणार आहे. व्यक्तिगत द्वेषापोटी शरद पवारांनी हा बॉम्ब देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडला आहे. परंतु निश्चित हे बुमरँग होणार असून त्यातून समाजाचे नुकसान शरद पवार करत आहेत. हा सुसाईड बॉम्ब समाजाला घेऊन नुकसान पोहचवणारा आहे. त्यामुळे निश्चित याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील. शरद पवार आपली भूमिका स्पष्ट न करता परस्पर जरांगेंसारखे सुसाईड बॉम्ब या महाराष्ट्रात वापरतात. हे दुर्दैव आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त
आझाद मैदानावर उपोषणास बसलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी विरोधकांसह सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार मैदानात पोहचले होते. सत्ताधारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आझाद मैदानात हजेरी लावत सरकारने आता ठाम भूमिका घेण्याची वेळ आली आहे असं विधान केले. आझाद मैदानात उद्धवसेनेचे खा. संजय बंडू जाधत (परभणी), खा. ओमराजे निंबाळकर (धाराशिव), आ. कैलास पाटील (धाराशिव), राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खा. बजरंग सोनवणे (बीड), खा. भास्कर भगरे (दिंडोरी), खा. निलेश लंके (अहमदनगर), आ. संदीप क्षीरसागर (बीड), आ. अभिजित पाटील (माळा), राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजू नवघरे (वसमत) यांच्यासह शिवसंग्राम संघटनेच्या ज्योती मेटे व करुणा मुंडे यांनी भेट घेत त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला.
दरम्यान, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत झगडणारच. मराठा आरक्षणाच्या लढ्यात गोळ्या घातल्या तरी विजयाशिवाय मागे हटणार नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून कोणीही हलणार नाही, असा निर्धार मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी आझाद मैदान येथे व्यक्त केला आहे.