बीडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाला उसळली गर्दी
By Admin | Updated: August 30, 2016 13:01 IST2016-08-30T11:30:19+5:302016-08-30T13:01:40+5:30
कोपर्डी अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने आज बीड शहरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

बीडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाला उसळली गर्दी
- ऑनलाइन लोकमत
बीड, दि. ३० - कोपर्डी अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने आज बीड शहरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी जिल्ह्यातून मोर्चात सहभागी होण्यासाठी येणा-या लोकांची रस्त्यावर अक्षरश: रीघ लागली आहे.
वाहनांची पार्किंगची व्यवस्था शहराबाहेर करण्यात आलेली असल्याने पार्किगपासून स्टेडियमकडे लोकांची रस्त्यावर गर्दी उसळली आहे. कोपर्डी अत्याचार प्रकरणी आज दुपारी १२ वाजता मराठा क्रांती मुक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सकाळपासून बीडकडे येणारी वर्दळ वाढली आहे.
वाहतूकीचे मार्गही बदलण्यात आले आहेत. मराठा समाजाच्या मुकमोर्चासाठी एक हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असून, पन्नास पोलीस अधिकारी, तीन हजार स्वयंसेवक मदतीला आहेत. काहीवेळात मोर्चाला सुरुवात होणार असून, मोर्चाच्या मार्गावरील दुकाने बंद आहेत.
मोर्चात सहभागी होण्यासाठी आजी आल्या व्हिल चेअरवरून
मराठा समाजाच्या मुक मोर्चासाठी शहरात सकाळपासून रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली असून मोर्चासाठी एकत्र जमण्याचं ठिकाण स्टेडियम कॉम्पलेक्स हाऊसफुल्ल झाले. शशीकला हिंगे नावाच्या ८५ वर्षे वयाच्या आजीबाई त्यांना चालता येत नसल्याने व्हिल चेअरवर बसून मोर्चात सहभागी होण्यासाठी आल्या. मोर्चासाठी महिला आणि तरूणींचा सहभाग लक्षणीय आहे.