गुगल मॅपवरील नकाशा चुकीच्या पद्धतीने
By Admin | Updated: December 30, 2014 23:27 IST2014-12-30T22:05:20+5:302014-12-30T23:27:38+5:30
पर्यटकांना फटका : देशातील पहिल्या पर्यटन जिल्ह्याची वाताहात

गुगल मॅपवरील नकाशा चुकीच्या पद्धतीने
बांदा : देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून नावलौकिक मिळविलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गुगल मॅपवरील पर्यटन नकाशा हा चुकीचा दाखविण्यात आल्याने पर्यटकांना याचा फटका बसत आहे.नववर्षाच्या स्वागतासाठी देशी-विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने सिंधुदुर्गात येत आहेत. पर्यटकांना जिल्ह्यातील रस्त्यांची माहिती नसल्याने पर्यटक मार्ग शोधण्यासाठी गुगल मॅपचा आधार घेतात. मात्र, गुगल मॅपवर सर्च केल्यावर सिंधुदुर्गच्या पर्यटन नकाशामध्ये चुकीची माहिती दाखविण्यात आली आहे.
मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग ओरोस-वेंगुर्लेमार्गे गोवा असा दाखविण्यात आला आहे. या मार्गावर सावंतवाडी दाखविण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर कोकण रेल्वे मार्ग हा सावंतवाडी-कुडाळहून मालवण असा दाखविण्यात येत आहे. कोकण रेल्वे मार्ग हा मालवण येथून जात नसल्याने चुकीची माहिती नकाशात दाखविण्यात आली आहे. तसेच वेंगुर्ला-मालवण या सागरी महामार्गाचा नकाशामध्ये कुठेही उल्लेख आढळत नसल्याने यामुळे पर्यटकांची दिशाभूल होत आहे.पर्यटन नकाशात चुकीची माहिती दाखविण्यात आल्याने कित्येक पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नकाशातील चुकीची माहितीमुळे जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल होत असल्याने नकाशातील चुकीची माहिती तत्काळ बदलण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)