दोन महिलांचा बळी देणारी मांत्रिक गजाआड
By Admin | Updated: December 31, 2014 01:11 IST2014-12-31T01:11:27+5:302014-12-31T01:11:27+5:30
मठ बांधण्यासाठी दोन महिलांचा बळी देणाऱ्या महिला मांत्रिकासह १० जणांना सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी अटक केली.

दोन महिलांचा बळी देणारी मांत्रिक गजाआड
घोटी (नाशिक) : मठ बांधण्यासाठी दोन महिलांचा बळी देणाऱ्या महिला मांत्रिकासह १० जणांना सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. बळी दिलेल्या महिलेच्या मुलाने दफन केलेली जागा दाखविल्यानंतर तेथे उत्खननानंतर पोलिसांना दोन महिलांचे मृतदेह मिळाले.
संबंधित मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रु ग्णालयात पाठविण्यात आले. घोटीपासून जवळच असलेल्या टाके हर्ष गावात हा प्रकार घडला. कौटुंबिक सुख मिळत नसल्याचे सांगणाऱ्या मोखाडा तालुक्यातील काशीनाथ आणि गोविंद पुना दोरे यांनी बच्चीबाई नारायण खडके या मांत्रिकेच्या सांगण्यावरून स्वत:च्या जन्मदात्या आईचा बळी दिला होता. दोरे यांची बहीण पळण्यात यशस्वी झाली होती. श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी प्रकरण उघड केल्यानंतर घोटी पोलिसांनी अवघ्या बारा तासांत दोन्ही भावांना ताब्यात घेतले होते. त्यांनी आईचा बळी कसा दिला आणि कोणत्या ठिकाणी तिचे दफन केले हे पोलिसांना दाखविल्यानंतर उत्खनन करण्यात आले. तेथे दोन महिलांचे मृतदेह मिळाले. (वार्ताहर)
काशीबाई भिवा वीर या महिलेस भुताळीण ठरवून आधी तिचा बळी देण्यात आला. तिचा मृतदेह एका मोठ्या खड्ड्यात टाकल्यानंतर तो न बुजवता दुसऱ्या दिवशी बुधीबाई पुना दोरे यांचा बळी देण्यात आला.
बच्चीबाई खडके हिच्यासह हरी बुधा निरगुडे, लक्ष्मण बुधा निरगुडे, नारायण भिवा खडके, वामन हनुमंता निरगुडे, किसन बुधा निरगुडे, गोविंद पुनाजी दोरे, महादू कृष्णा वीर, बुगीबाई महादू वीर व काशीनाथ पुनाजी दोरे या दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सर्वांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.