मंत्रिमहोदय अडकले लिफ्टमध्ये
By Admin | Updated: December 28, 2014 01:36 IST2014-12-28T01:36:47+5:302014-12-28T01:36:47+5:30
वानवडी येथील महापालिकेच्या महात्मा फुले सभागृहाची लिफ्ट अचानक बंद पडल्याने आयुष विभागाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, कॅबिनेट मंत्री गिरीष बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे आतमध्ये अडकले.

मंत्रिमहोदय अडकले लिफ्टमध्ये
पुणे : वानवडी येथील महापालिकेच्या महात्मा फुले सभागृहाची लिफ्ट अचानक बंद पडल्याने आयुष विभागाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, कॅबिनेट मंत्री गिरीष बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे आतमध्ये अडकले. त्यावेळी आमदार जगदीळ मुळीक यांच्यासह कार्यकर्त्यांनी धावाधाव करून त्यांना त्यांना बाहेर काढले. हा प्रकार शनिवारी दुपारी घडला़ या आपत्कालीन प्रसंगी सभागृहाचे व्यवस्थापन पाहणारा महापालिकेचा एकही अधिकारी जागेवर नव्हता.
महात्मा फुले सभागृह येथे एका पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीपाद नाईक, गिरीष बापट, दिलीप कांबळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आले होते. नाईक, बापट, कांबळे व काही पदाधिकारी लिफ्टमध्ये गेले उर्वरित कार्यकर्ते जिन्याने सभागृहामध्ये जाऊ लागले. मात्र लिफ्टचा दरवाजा बंद झाल्यानंतर ती जागेवरच थांबली. लिफ्टचा दरवाजाही उघडेना व ती वरही जाईना. हा प्रकार बाहेरील कार्यकर्त्यांच्या लक्षात आला.
सभागृहाचा व्यवस्थापक अथवा तेथील व्यवस्था पाहणारा कोणीही कर्मचारी त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित नव्हता. त्यामुळे लिफ्टचा दरवाजा कसा उघडायचा असा पेच निर्माण झाला.
अखेर लिफ्टच्या दरवाजामध्ये मोटारीची चावी घालून तो उघडण्याचे प्रयत्न सुरू केले. दहा मिनिटांच्या प्रयत्नानंतर मंत्रीमहोदयांची लिफ्टमधून सुटका करण्यात यश आले. (प्रतिनिधी)
अन् धोका टळला : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना हृदयविकाराचा त्रास आहे, त्यामुळे ते जास्तवेळ लिफ्टमध्ये राहणे धोक्याचे होते. लिफ्टमधून लवकर त्यांना बाहेर काढण्यात यश आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वा:स सोडला. केंद्रीय मंत्री, राज्याचे कॅबिनेट व राज्यमंत्री एका कार्यक्रमासाठी महापालिकेच्या सभागृहामध्ये आले असताना सभागृहाच्या व्यवस्थापकांसह महापालिकेचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता त्यामुळे याप्रकाराविरूध्द आंदोलन छेडणार असल्याचे पुष्कर तुळजापूरकर यांनी सांगितले.