'Manthan' at Gadkari's house after 'Exit Polls' | ‘एक्झिट पोल्स’नंतर गडकरींच्या घरी ‘मंथन’
‘एक्झिट पोल्स’नंतर गडकरींच्या घरी ‘मंथन’

नागपूर : ‘एक्झिट पोल्स’ने भाजपा व रालोआ परत सत्तेत येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाचे नेते सावध असून निकालानंतरच्या संभाव्य परिस्थितीवर संघभूमीत मंथन झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी संघ सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह व्ही. भागय्या, पश्चिम बंगालमधील भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत बराच वेळ चर्चा झाली.


एरवी संघाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी ‘व्हीव्हीआयपी’ नेते संघ मुख्यालयात जातात. मात्र सोमवारी सकाळी ११.३०च्या सुमारास अचानक भय्याजी जोशी गडकरी यांच्या रामनगर येथील निवासस्थानी पोहोचले. कैलास विजयवर्गीय व व्ही.भागय्या हेदेखील त्याच सुमारास पोहोचले होते. त्यानंतर सुमारे दोन तास विविध मुद्यांवर सखोल मंथन झाले. प्रामुख्याने ‘एक्झिट पोल्स’मधील अंदाज, बंगाल व उत्तरप्रदेशमधील स्थिती व निकालानंतरची संभाव्य पावले यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान विजयवर्गीय यांनी मात्र ही बैठक पूर्वनियोजित असल्याचे सांगितले. यात राजकीय विषयांवर नव्हे तर सामाजिक विषयांवर चर्चा झाली. देशाच्या विविध भागात ग्रामविकास, स्वदेशी तसेच अंत्योदय प्रकल्प राबविण्याबाबत ही बैठक होती, असे त्यांनी सांगितले.


भाजपाध्यक्षपदी शहाच हवेत
अमित शहा यांचा भाजपाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला आहे. सातत्याने दोनदा ते या पदावर होते. पुढील अध्यक्षपदाबाबत विजयवर्गीय यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता मी कुठल्याही स्पर्धेत नाही. अमित शहा यांच्या नेतृत्वात भाजपाने प्रभावी कामगिरी केली आहे. भाजपाध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा तेच हवे. पक्षाने नियमांमध्ये शिथिलता आणली पाहिजे, असे ते म्हणाले.


प्रज्ञा सिंह चुकांची पुनरावृत्ती करणार नाही
भोपाळमधील भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसेंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर पंतप्रधानांनी मत मांडले असून त्यावर अधिक बोलणे योग्य होणार नाही. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असून पक्षाची ध्येय, धोरणे आणि विचारांची त्यांना पूर्ण माहिती नव्हती. आता त्यांना अनेक गोष्टीबाबत पक्षाचे मत आणि दृष्टिकोन कळला आहे. त्यामुळे भविष्यात त्या बोलताना दक्षता घेतील आणि चुकांची पुनरावृत्ती होऊ देणार नाहीत असे विजयवर्गीय म्हणाले.

बंगालमध्ये भाजपला २० जागा मिळतील
मागील वेळी लोकसभा निवडणुकांत भाजपाला पश्चिम बंगालमध्ये दोन जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदा हा आकडा २० वर पोहोचेल. पश्चिम बंगालमध्ये गेल्या ३० वर्षांपासून निवडणुकीत हिंसाचार होतो. त्यामुळे बंगालमध्ये निवडणूक आणि हिंसाचार हे समानार्थी शब्द बनले आहेत. राज्यातील जनता या सर्व गोष्टींना कंटाळली असून त्यांना विकास हवा आहे. भाजपाला अभूतपूर्व यश मिळेल, असा विश्वास विजयवर्गीय यांनी व्यक्त केला.


Web Title: 'Manthan' at Gadkari's house after 'Exit Polls'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.