मनोरुग्ण चढला महाराष्ट्र एक्स्प्रेसवर!

By Admin | Updated: April 29, 2016 02:23 IST2016-04-29T02:23:43+5:302016-04-29T02:23:43+5:30

विद्युत प्रवाह बंद करून या व्यक्तीला खाली उतरविण्यात आले.

Manoroga Chavan Maharashtra Express! | मनोरुग्ण चढला महाराष्ट्र एक्स्प्रेसवर!

मनोरुग्ण चढला महाराष्ट्र एक्स्प्रेसवर!

अकोला: नागपूरकडे जाणार्‍या महाराष्ट्र एक्स्प्रेसवर मनोरुग्ण चढल्याची घटना गुरुवारी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास अकोला रेल्वे स्थानकावर घडली. अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक २ वर महाराष्ट्र एक्स्प्रेस थांबली असताना वातानुकूलित डब्यावर एक व्यक्ती चढली आणि तेथेच झोपली. हा प्रकार प्लॅटफार्मवरील इतर प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. सुदैवाने उच्चदाब विद्युत वाहिनीला शरीराचा स्पर्श न झाल्याने ती वाचली. विद्युत प्रवाह बंद करून या व्यक्तीला खाली उतरविण्यात आले. रेल्वे पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतले. रेल्वे स्थानकावर चप्पल दुरुस्तीचे काम करणारा श्रीकृष्ण गोपाळ शेगोकार या तरुणाने त्या व्यक्तीला खाली ओढले. तो मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांनी दिली असून, मध्यप्रेदशातील बालाघाट जिल्ह्यातील लामता गावातील धुलिचंद मरठे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो महाराष्ट्र एक्स्प्रेसने गोंदिया येथे जात होता. अकोला येथे १२.१५ वाजताच्या सुमारास गाडी आल्यानंतर तो एसी डब्यावर चढला होता. अकोला रेल्वे स्थानकावर हा गोंधळ सुरू असल्याने महाराष्ट्र एक्स्प्रेस एक तास स्थानकावर थांबवून ठेवण्यात आली. त्यामुळे प्रवासांना नाहक त्रास सहन करावा लागला. रेल्वेवर चढलेल्या व्यक्तीला खाली उतरविण्यात आल्यानंतर १.१५ वाजताच्या सुमारास गाडी नागपूरकडे रवाना करण्यात आली. रेल्वे पोलीस ठाणेदार राजेश बडे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या मनोरुग्ण व्यक्तीला ताब्यात घेतले.

Web Title: Manoroga Chavan Maharashtra Express!