लोणारला ‘वर्ल्ड हेरीटेज नॅचरल साईट’चा दर्जा देण्याचा मानस

By Admin | Updated: July 3, 2014 22:55 IST2014-07-03T20:45:52+5:302014-07-03T22:55:18+5:30

कॅनडाचे तज्ज्ञ डॉ. बोडार्ड यांची लोकमतशी बातचित

Manor to give the status of 'World Heritage Natural Site' to Lonar | लोणारला ‘वर्ल्ड हेरीटेज नॅचरल साईट’चा दर्जा देण्याचा मानस

लोणारला ‘वर्ल्ड हेरीटेज नॅचरल साईट’चा दर्जा देण्याचा मानस

लोणार : खार्‍या पाण्याच्या सरोवराचे ठिकाण असलेले लोणार आणि अजिंठा वेरुळचा विकास आराखडा तयार करण्याचे काम महाराष्ट्र सरकारने आमच्या संस्थेला सोपविले असून, ते प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. लोणार सरोवराला ह्यवर्ल्ड हेरिटेज साईटह्णचा नव्हे तर ह्यवर्ल्ड हेरिटेज नॅचरल साईटह्णचा दर्जा मिळवून देण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करू, अशी ग्वाही कॅनडा येथील एसएजेई मिट्रीयल संस्थेचे तज्ज्ञ कन्स्लटंट डॉ. फ्रान्सीस बोडार्ड यांनी लोकमतशी केलेल्या बातचीतदरम्यान दिली.
प्रश्न - यापूर्वी लोणारला कधी भेट दिली होती का?
उत्तर - नाही. कॅनडामधील प्राचीन पर्यटनस्थळांचे संवर्धन आणि त्यांचा विकास पाहून, महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाने लोणार आणि अजिंठा, वेरुळ या प्राचीन पर्यटनस्थळांचा त्याच धर्तीवर विकास करण्यासाठी कॅनडाच्या सहकार्याने विकास आराखडा तयार करण्याचे ठरवले. त्या मोहिमेचा एक भाग म्हणून पूर्वअभ्यासासाठी याठिकाणी येण्याचा योग जुळून आला.
प्रश्न - कोणते विचार समोर ठेवून तुम्ही याठिकाणी आलात?
उत्तर - लोणारला जागतीक स्तरावर पर्यटनाचा केंद्रबिंदू बनवून वर्ल्ड हेरिटेज नॅचरल साईटचा दर्जा मिळवून देऊन पर्यटकांसाठी विविध सुविधा निर्माण करण्याचा विचार डोक्यात ठेवून याठिकाणी आलो आहोत.
प्रश्न - लोणारचा परिसर पाहून काय वाटले?
उत्तर - येथील परिसरावर निसर्गाने दोन्ही हातांनी उधळण केली आहे. येथील पर्यटन स्थळे, खार्‍या पाण्याचे सरोवर, प्राचीन कलाकुसरीचा अविष्कार असलेली हेमाडपंथी मंदिरे मन मोहून टाकणारी आहे. जागतिक किर्तीचे पर्यटनस्थळ असूनही, येथे सुविधा मात्र अपुर्‍या आहेत.
प्रश्न - लोणारच्या विकासासाठी काय केले पाहिजे?
उत्तर - लोणारचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी मोठा वाव आहे. ज्याप्रमाणे लोणारची प्रसिद्धी व्हायला हवी, ती आजपर्यंत झाली नाही. लोणारचा विकास करताना सर्वच बाबतीत एकच नियम लावणे योग्य नाही. त्यासाठी झोन्सची निर्मिती केली पाहिजे. याठिकाणी पर्यटकांसाठी सोयीसुविधा वाढत नाही, पर्यटकांना राहण्यासाठी हॉटेल्स, लॉजची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत पर्यटक याठिकाणी येणार नाहीत. पर्यटन वाढीसाठी शेगाव एक चांगले उदाहरण आहे.
प्रश्न - पर्यटन विकासासाठी कोणत्या उपाययोजना सुचविणार?
उत्तर - लोणार येथे पर्यटन विकास झाला पाहिजे. याचाच अभ्यास करण्यासाठी आम्हाला येथे पाठविण्यात आले आहे. पर्यटन विकासासाठी शेगाव डोळय़ासमोर ठेवले, तर तुम्हाला कॅनडाची मदत घेण्याची गरजच पडणार नाही. पर्यटन वाढीसाठी काय केले पाहिजे हे शेगावमध्ये दिसून येते. शेगाव, अजिंठा, लोणार, सिंदखेडराजा आणि जवळच्या आणखी पर्यटनस्थळांचे एक वतरूळ तयार झाल्यास एक पर्यटनाला वाव मिळेल. लोणारमध्ये पर्यटनाला मोठय़ा प्रमाणात वाव आहे. मात्र येथे आधी सुविधा निर्माण करा आणि नंतरच त्यांचे मार्केटींग करा!. लोणारला येणारा प्रत्येक पर्यटक हा संशोधक राहणार नाही. १00 पैकी ९0 पर्यटक हे केवळ पर्यटनासाठी घराबाहेर पडतात. यासाठी लोणारकडे फक्त शास्त्रीयदृष्ट्या न बघता कौटुंबिक पर्यटनस्थळ म्हणून विकास करणे गरजेचे आहे.
प्रश्न - लोणारविषयी तुमचे ह्यव्हिजनह्ण काय आहे?
उत्तर - लोणारला सेव्हीयस इन्फर्मेशन काऊंटर बनवायचे असून, त्यामाध्यमातून स्थानिक आणि परिसरातील कोणतीही उत्पादनं पर्यटकांना आपल्यासोबत घेऊन जाता येतील. लोणारच्या पर्यटन क्षेत्राचा विकास कॅनडामधील पर्यटनस्थळांप्रमाणे करण्याचे उद्दीष्ट असून, येत्या २ ते ३ वर्षात लोणारला ह्यवर्ल्ड हेरिटेज नॅचरल साईटह्ण म्हणून समोर आणण्यासाठी युनोलासुद्धा आमंत्रित करु शकतो.
प्रश्न - स्थानिकांचे काय सहकार्य हवे?
उत्तर - लोणारच्या सर्वांगीण विकासात स्थानिकांचे महत्वपूर्ण योगदान लागणार आहे. यासाठी त्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पुढाकार घेतल्यास, स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. भविष्यात पर्यटकांची वाढणारी संख्या पाहता त्यांना सुविधा देण्याकरीता स्थानिकांना प्राधान्य राहणार आहे. स्थानिकांपैकी काहींना प्रशिक्षण देवून रोजगार देण्याचा प्रयत्न केला जाईल. आम्ही एकदा ही यंत्रणा उभारली की, ती टिकवून ठेवण्याचे काम स्थानिक लोकांचेच राहील.
प्रश्न - तुम्ही शासनास काय अहवाल सादर करणार आहात?
उत्तर - जागतीक वारसा लाभलेल्या लोणार येथील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी येथे काय केले पाहिजे, हे जाणून घेण्यासाठी पाच दिवस लोणार येथे थांबून येथील महसूल, वन, नगर रचनाकार, नगरपालीका, भूमिअभिलेख, पर्यावरण, राज्य परिवहन महामंडळ, पुरातत्व विभाग, पोलीस आदी सर्व विभागाच्या अधिकार्‍यांशी सकारात्मक दृष्टीकोनातून चर्चा केली. चर्चेमधून काही प्रश्नांची उत्तरे योग्य तर काहींची अयोग्य मिळाली. लोणार भेटीतून मिळालेली माहिती सोबत घेवून जात आहे. २४ सप्टेंबर रोजी पर्यटन विभागाचे एक शिष्टमंडळ कॅनडात येणार असून, ती माहिती त्यांना सोपविण्यात येईल. लोणारचे भौगोलीकदृष्ट्या असलेले महत्व जाहिरातीमधून जगाच्या कानाकोपर्‍यात कशाप्रकारे पोहचविता येईल, येथील पर्यटन स्थळांचे सौंदर्यीकरण, अजिंठा, शेगाव येथे असलेल्या सुविधांप्रमाणे येथेही सुविधा कशा देता येतील, याचा समावेश यामध्ये राहील. लोणारच्या विकासासाठी संबंधित सर्व विभागांचा सहभाग कसा घेता येईल, याचाही विचार या अहवालात केला जाणार आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासाचा अहवाल सप्टेंबर महिन्यात भारताला सोपविला जाणार असून, ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहे.

Web Title: Manor to give the status of 'World Heritage Natural Site' to Lonar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.