Manoj Jarange Patil News: बीड प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले. या प्रकरणी विरोधकांनी सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. अखेरीस धनंजय मुंडे यांना राजीनामा दिला. या घडामोडी घडत असताना भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना भक्कम पाठिंबा जाहीर केला होता. आता पुन्हा एकदा नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. यावरून मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
बीडचे भूमिपुत्र धनंजय मुंडे नारळी सप्ताहाला येणार होते. त्यांना हेलिकॉप्टरचा क्लिअरन्स मिळाला नाही, म्हणून त्यांचा दौरा रद्द झाला. भगवान गडाचे म्हणून धनंजय मुंडे यांना जाहीर केले आहे. म्हणून तुम्ही त्याचे टेन्शन घेऊ नका. आपण मोठा कार्यक्रम करू. त्यांच्या गालावरून वारे गेले आहे. सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा. चांगली वाणी बंद पडली. ती पुन्हा सुरू व्हावी. पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्याकडून घडावे एवढेच बोलू, असे नामदेवशास्त्री यांनी सांगितले. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी कठोर शब्दांत भाष्य केले.
पुन्हा एकदा बीड जिल्ह्यावर अन्याय अत्याचार होणार
त्या गादीचा आम्ही सन्मान करतो, त्यामुळे आम्ही काही बोलणार नाही. परंतु त्यांच्या अंगावरून वारे गेले की गालावरून वारे गेले याच्याशी आम्हाला काही घेणे-देणे नाही. त्यावर मी बोलणार पण नाही. ते पुन्हा पदावर आले तर पुन्हा गुंडगिरी वाढणार, टोळ्या वाढणार आणि पुन्हा लोक मारणार आणि पुन्हा एकदा बीड जिल्ह्यावर अन्याय अत्याचार होणार. ज्या वेळेस मंत्रिपदाचा दुरुपयोग करून गुंडगिरी सुरू झाली, खंडण्या सुरू झाल्या. आणि लोकांच्या हत्या झाल्या, त्यावेळी जिल्ह्यातील सर्व समाजातील लोकांचे मन दुखले, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महंत नामदेव शास्त्री काय बोलले, याच्यावर मी बोलणार नाही, शेवटी गादीचा सन्मान आम्ही करतो. ते काहीही बोलले तरी आम्ही बोलणार नाही. परंतु ते पुन्हा पदावर येणे म्हणजे अन्याय अत्याचार त्या जिल्ह्यातल्या लोकांवर सुरू होणे, त्याचे दुष्परिणाम पुन्हा एकदा सरकारला भोगावे लागतील. कारण आत्ताच मंत्रिपदाचा गैरवापर करून किती गुंडगिरी वाढली होती, ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे होते तेव्हा इतकी गुंडगिरी नव्हती. त्यामुळे ते पुन्हा पदावर आले तर आम्ही वस्ताद आहेतच, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.