Manoj Jarange Patil Slams Chhagan Bhujbal: मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या जीआरला ओबीसी समाजाकडून तीव्र आक्षेप घेतला जात असून, यासंदर्भात आंदोलन करण्याचा तसेच न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावरून आता मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मीडियाशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. देवाने अक्कल दिली असती तर बरे झाले असतं, मुंबईत मराठ्यांची मुले गेली. महाराष्ट्राला एक संस्कृती दिसली, मुंबईचे खरे मालक ही मुले होती, तिथले लोक पाहुणे आहेत. हे इथे शोभत नाही, यांना नेपाळ, इकडे तिकडे सोडायला हवे, ह्याला नागालँड, इंग्लड अशा ठिकाणी सोडायला पाहिजे, ते तिकडेच शोभतात, या शब्दांत मनोज जरांगे यांनी हल्लाबोल केला.
महाज्योतीला हजारो कोटी दिले, तेव्हा काही म्हणालो का?
महाज्योतीला यापूर्वी हजारो कोटी दिले तेव्हा आम्ही काही म्हणालो का? सारथीला आता कुठे यायला लागले आहेत. वेडा-वाकडा जीआर यानेच १९९४ मध्ये काढायला लावला. मराठ्यांनी मर्दानगी दाखवून आतापर्यत मिळवले आहे. आतापर्यंत आमचे आरक्षण खाल्ले, ते आम्ही परत घेत आहोत, गरीब ओबीसींनी हे समजून घ्यावे. आरक्षण रद्द करायचे आहे का? इतके दिवस खात होते, ते रद्द करायचे आहे का? तुम्ही प्रगत झाला आहात, तर आरक्षण सोडा. यांचे अजूनही पोट भरत नाही का? भरत्या, शिक्षण, सगळे यांनीच खाल्ले. राजकारणापायी हे ओबीसींना उलटे सांगत आहे. याचे ऐकू नका, ते मेटाकुटीला आला आहे. डोळे लाल दिसू नये, म्हणून काळा चष्मा घातला. आता यापुढे विसरभोळा मंत्री नाव द्यावे, अशी टीका जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर केली.
दरम्यान, मराठा समाजाला स्वतंत्र मराठा आरक्षण नको का? तुम्हाला दिलेले स्वतंत्र दहा टक्के आरक्षण नको का? ते रद्द करायचे का? ते रद्द झाले तर ईडब्ल्यूएसमध्ये ही तुम्हाला आरक्षण आहे ते पण तुम्हाला नकोच का? याचे उत्तर महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक माजी मुख्यमंत्री आहेत, केंद्रात मराठा समाजाचे मंत्री होते, आमदार आहेत, खासदार आहेत, जे शिकलेले आहेत, त्यांच्याकडून मला या उत्तराची अपेक्षा आहे. ज्याला काही समजत नाही, अशिक्षित आहे, माहिती नाही, त्यांच्याकडून मला या उत्तराची अपेक्षा नाही, असा टोला भुजबळ यांनी जरांगे यांना उद्देशून लगावला होता.