Manoj Jarange Patil News: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर लावून धरली आहे. यावरून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला. यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे.
बीड प्रकरणात सक्रीय होऊन मनोज जरांगे यांनीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत आग्रही मागणी केली होती. त्यानंतर ते पुन्हा मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उपोषणाला बसले. उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे यांनी बीड प्रकरणावर भाष्य करताना नामदेवशास्त्रींवर निशाणा साधला. आम्ही तुमचा सन्मान करतो. पण आपण आपले बघावे दुसऱ्यांकडे डोकावून पाहू नका. स्वतःची चूक झाकण्यासाठी डिवचू नका, तुमच्याकडून चूक झाली आहे. एका समाजाला एका बाजूला नेण्याचे काम झाले आहे. जातीय सलोखा बिघडवायला नको होता. पण धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे या सगळ्याचा चौथा अंक पाहायला मिळाला. आरोपींच्या बाजूने मोर्चे निघाले. जातीयवादाचा हा अंक खरेच भयंकर आहे, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला.
नामदेवशास्त्रींनी जातीयवादाचा नवा अंक दिला
महाराजांना जे बोलायचे होते ते बोलून गेले आणि जातीयवादाचा नवीन अंक देऊन गेले. नामदेव शास्त्री आरोपींचे समर्थन करत आहेत. संतोष देशमुख यांची हत्या केली म्हणून आरोपींना आनंद वाटला असेल. पण ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे तिथेही जातीयवाद होऊ शकतो, याचा नवीन अंक पाहायला मिळत आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.
दरम्यान, जे गुन्हेगार असतील, त्यांचा शोध चालू आहे. ज्या लोकांनी हे प्रकरण केले, त्यांची मानसिकता का नाही दाखवली, त्यांनाही अगोदर मारहाण झाली होती, ते दखल घेण्याजोगे आहे. तो गावातला विषय होता, पण त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडला. धनंजय मुंडे खंडणीवर जगणारा माणूस नाही, आम्ही त्यांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत. मी त्याला म्हणालो की, तू वारकरी सांप्रदायामध्ये असता तर एवढा त्रास सहन केल्यानंतर मोठा संत झाला असता. कारण धनंजय मुंडे यांनी घर फुटले तेव्हा भरपूर सोसले आहे. गेल्या ५३ दिवसांपासून त्याची मानसिक अवस्था खालावली, असे महंत नामदेवशास्त्री यांनी म्हटले होते.