देशाच्या विरुद्ध बोलणा-यांना धडा शिकवू - मनोहर पर्रीकर
By Admin | Updated: July 30, 2016 16:28 IST2016-07-30T16:25:24+5:302016-07-30T16:28:58+5:30
सैन्य प्राणांची बाजी लावत असताना भारतमातेच्या विरोधात अपमानास्पद भाष्य करणा-यांना धडा शिकविला जाईल, असा इशारा संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिला

देशाच्या विरुद्ध बोलणा-यांना धडा शिकवू - मनोहर पर्रीकर
>ऑनलाइन लोकमत -
पुणे, दि. 30 - भारतीय सैन्य कोणत्या परिस्थितीत सीमेवर लढा देते, याची सर्वांनी जाणीव ठेवण्याची गरज आहे. सैन्य प्राणांची बाजी लावत असताना भारतमातेच्या विरोधात कोणालाही कोणतेही अपमानास्पद भाष्य करण्याचा अधिकार नाही. असे भाष्य करणा-यांना धडा शिकविला जाईल, असा इशारा संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिला.
पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि भारतशक्ती डॉट इन यांच्या वतीने नितीन गोखले लिखित ‘सियाचिन : धगधगते हिमकुंड’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी पर्रिकर बोलत होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ‘सियाचिन : धगधगते हिमकुंड’ या पुस्तकावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. वायुदलाचे माजी उपाध्यक्ष ए. एम. भूषण गोखले, सियाचिन विषयक तज्ज्ञ लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी, प्रसिद्ध लेखक व संरक्षण विश्लेषक नितीन गोखले आदी मान्यवर यामध्ये सहभागी झाले होते.
'भारतीय सैन्य अत्यंत सक्षम, संवेदनशील आणि शक्तिशाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा हेच अंतरिम ध्येय डोळयासमोर ठेवून सैन्य देशासाठी प्राणपणाने लढते. आपले सैन्य क्रूरपणे कोणत्याही भागात घुसखोरी करुन विनाकारण हल्ला चढवत नाही. भारतीय सैन्याचीही काही तत्वे आहेत आणि ती काटेकोरपणे पाळली जातात. सोशल मिडियाच्या माध्यमातून सैन्याबाबत गैरसमज पसरवणारे व्हिडिओ व्हायरल होतात. अशा बनावट व्हिडिओंवर विश्वास न ठेवता सर्वसामान्य नागरिकांनी त्यांचा आदर करायला हवा. सैन्य बळकट आहेच; त्यांना नागरिकांचाही पाठिंबा मिळणेही महत्वाचे आहे. देशभक्ती हे आपले परम कर्तव्य आहे. या गुणांचे बाळकडून घरातूनच मिळत असते. आर्थिक सत्ता आणि सक्षम, बळकट सैन्य असेल तर देशासमोरील सर्व समस्या सुटू शकतात. त्यामुळेच देशावर कोणतेही संकट आल्यास सैन्य हातावर हात धरुन बसणार नाही. देशाच्या रक्षणासाठी आवश्यक असलेले सर्व अधिकार भारतीय सैन्याला देण्यात आले आहेत. सरकारही सुरक्षेसंदर्भात आक्रमकपणे मात्र संयमी भूमिका मांडत आहे', असं मनोहर पर्रीकर बोलले आहेत.
‘संकटातून संधी शोधणे आणि युध्दाचा अंत ही आपली उद्दिष्टे असायला हवीत. १९६२ च्या युध्दातील काही चुकांमुळे मोठे प्रश्न निर्माण झाले. १९६५ मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी भारतीय सैन्य, सरकार आणि राजकीय पक्ष यांच्यात समन्वय घडवून आणला आणि त्याचा फायदा देशाला झाला. १९७१ च्या युध्दात सीमा निश्चित न झाल्याने सियाचिनचा प्रश्न उभा राहिला. सियाचिन ही भारताची अमूल्य संपत्ती आहे आणि ती इतर कोणाच्याही हाती सोपवली जाणार नाही’ असं भूषण गोखले यांनी म्हटलं आहे.
‘पाकिस्तान आणि चीनला हातमिळवणी करता येऊ नये, यासाठी सियाचीनवर तळ ठोकून राहणे अत्यंत गरजेचे आहे. सियाचिन पाकिस्तानला देऊन टाका, असे म्हणणारे लोक देशद्रोही आहेत. भारतीय सैन्याच्या पराकष्ठेमुळे हा भाग अद्याप भारताच्या ताब्यात आहे', असं नितीन गोखले बोलले आहेत.
संजय कुलकर्णी म्हणाले, ‘१९८४ मध्ये सियाचिन मोहिमेमध्ये मला सहभागी होता आले. तेथील परिस्थिती अत्यंत विदारक असताना भारतीय सैन्याने केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. ’
आमीर खानला टोला -
वर्तमानपत्रातील बातम्या वाचून माझी पत्नी किरणला देश सोडून जावेसे वाटते, असे विधान अभिनेता आमीर खानने केल्यानंतर बराच वादंग निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पर्रीकर म्हणाले, ‘आपले घर छोटे असले तरी ते आपलेसे वाटते. स्वत:च्या घराची आपल्याला लाज वाटता कामा नये. त्यामुळे देशाबाबत केलेले हे विधान अत्यंत चुकीचे आहे. देशभक्तीसारखे गुण आपण घरातूनच शिकले पाहिजेत. अशा विधानांनी समाजात चुकीचा संदेश जातो.