बेवारस मनोरुग्ण रेल्वेने येतात सांगलीत
By Admin | Updated: November 2, 2014 23:29 IST2014-11-02T22:08:53+5:302014-11-02T23:29:42+5:30
दिशाहीन भटकणे : भूकबळीने मृत्यूचे प्रमाण वाढले, वर्षाकाठी ३0 बेवारस मृतदेह

बेवारस मनोरुग्ण रेल्वेने येतात सांगलीत
सचिन लाड - सांगली -सांगली, मिरजेत गेल्या काही महिन्यात बेवारसांच्या मृत्यूचे वाढलेले प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे. मृत झालेली बेवारस व्यक्ती कोण आहे? कोठून आली? याचा शोध लागत नाही. यामागचे प्राथमिक कारण पोलिसांनी शोधून काढण्याचा प्रयत्न केला असता, बेवारस व्यक्ती या मनोरुग्ण आहेत, वेडाच्या भरात दिशाहीन होऊन भटकत रेल्वेने सांगली, मिरजेत येत असल्याची माहिती समोर येत आहे. अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गोष्टीपासून ते वंचित राहत असल्याने त्यांचा मृत्यू होत आहे.
डोक्यावर परिणाम झाल्याने घरातील व्यक्ती निघून गेल्याच्या अनेक तक्रारी राज्यातील विविध पोलीस ठाण्यात नोंद आहेत. या व्यक्ती जातात कुठे? असा प्रश्न पडतो. वेडाच्या भरात त्यांची भटकंती होत राहते. रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांकडून काही तरी खायला मिळेल, असा विचार करुन ते तिथे जातात. मात्र स्टेशनवरुन त्यांना हाकलून लावले जाते. अनेकदा ते दिसेल त्या रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेत तिकीट तपासणीसाठी यंत्रणा सक्षम नसल्याने या मनोरुग्णांना पकडण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. रेल्वे जिथे थांबेल, तिथे ते उतरतात. अशाप्रकारे सांगली, मिरज रेल्वे स्टेशनवरुन अनेक मनोरुग्ण शहरात दाखल होत आहेत.
कर्नाटकात फिरणाऱ्या मनोरुग्णांना पकडून त्यांना महाराष्ट्रात आणून सोडल्याचे बोलले जाते. त्यामुळे गेल्या काही महिन्यात शहरात फिरणाऱ्या मनोरुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पूर्वीचे जुने मनोरुग्ण गायब झाले आहेत.
प्रत्येक चौकात चार-पाच दिवसाला वेगळाच मनोरुग्ण नजरेस पडतो. स्टेशन चौकातील फूटपाथवर तर मनोरुग्णांची रांग लागलेली आहे. रात्रीच्यावेळी ते थंडीत कुडकुडत बसलेले असतात. अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गोष्टींपासून वंचित राहत आहेत. पोटाला अन्नच मिळत नसल्याने भूक व स्वच्छतेच्या अभावामुळे त्यांचा मृत्यू होत असल्याचे शवविच्छेदन तपासणीत स्पष्ट होत आहे.
शेवटपर्यंत बेवारसच
बेवारस मृतदेह सापडल्यानंतर पोलीसच त्याचे नातेवाईक बनतात. ओळख पटविण्याचे प्रयत्न केले जातात, मात्र त्यांना यश येत नाही. प्रत्येकवर्षी पन्नासहून अधिक बेवारस मृतदेह सापडत आहेत. एक-दोन अपवाद वगळले, इतर मृतदेह बेवारसच राहिले आहेत. गेल्या महिन्याभरात दहा ते बारा बेवारस मृतदेह सापडले. यातील अनेकजण मनोरुग्ण असावेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
रकमेची अखेर तजवीज
बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पोलिसांना पाचशे रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी घेतला आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कचऱ्याच्या गाडीचा उपयोग होत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. यासाठी वर्षाकाठी पंधरा ते वीस हजार रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.