माणदेशी एक्स्प्रेस ललिता बाबर अडकली विवाहबंधनात
By Admin | Updated: May 16, 2017 14:54 IST2017-05-16T14:54:17+5:302017-05-16T14:54:17+5:30
धावपटू ललिता बाबर लग्नबेडीत अडकली आहे. कोण आहे ललिता बाबरचा पती?

माणदेशी एक्स्प्रेस ललिता बाबर अडकली विवाहबंधनात
ऑनलाईन लोकमत
सातारा, दि. 16 - ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केलेली धावपटू ललिता बाबर हिनं आजवर असंख्य सुवर्ण, रजत पदक जिंकली आहेत. मंगळवारी ललिताच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली आहे. कारण ललिता आता डॉ. संदीप भोसले यांच्यासोबत लग्नबेडीत अडकली आहे. सातारा येथे मोठ्या थाटामाटात ललिताचा विवाहसोहळा पार पडला. ललिता आणि डॉ. संदीप भोसले यांच्या विवाह सोहळ्यास देशभरातील दिग्गज मंडळी वऱ्हाडी म्हणून उपस्थित होती.
‘माणदेशी एक्स्प्रेस’ ललिता बाबर आणि सोलापूरच्या लिगाडवाडीसारख्या दुष्काळी गावातून उच्चपदस्थ अधिकारी बनलेले डॉ. संदीप भोसले यांचा विवाह मंगळवारी दुपारी 2.35 वाजता साताऱ्यातील यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये थाटात पार पडला. नेहमी "स्पोर्ट्स ड्रेस"मध्ये झळकणाऱ्या ललिताची नववधू वेशभूषा साऱ्यांनाच भावून गेली. विवाह सोहळ्याच्या व्यासपीठावर केलेल्या डेकोरेशनमधील "ऑलिम्पिक" चे बोधचिन्हही सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.
यावेळी चित्रपट अभिनेत्री अमृता खानविलकर, निर्माता संजय जाधव, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार अनिल बाबर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषद-पंचायत समिती पदाधिकारी, बहुतांश लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच सामाजिक-राजकीय कार्यकर्ते मोठ्या उत्साहानं उपस्थिती लावली.