मंजुळा शेट्ये चक्कर येऊन कारागृहात कोसळली, पोलिसांचा कोर्टात अजब दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 14:13 IST2017-07-24T14:13:30+5:302017-07-24T14:13:55+5:30
इतर प्रकरणातही दोषींना वाचवण्यासाठी अशीच मदत करता का? असा थेट सवाल न्यायालयाने विचारला आहे

मंजुळा शेट्ये चक्कर येऊन कारागृहात कोसळली, पोलिसांचा कोर्टात अजब दावा
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - भायखळा कारागृहातील कैदी मंजुळा शेट्ये चक्कर येऊन कारागृहात कोसळली असल्याने तिच्या शरिरावर खुणा असल्याचा अजब युक्तिवाद पोलिसांनी उच्च न्यायालयात केला आहे. विशेष त्यांचा हा अजब युक्तिवाद ऐकून न्यायालयानेही आपला संताप व्यक्त करत पोलिसांना झापलं आहे. मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणी प्रदीप भालेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सुनावणीदरम्यान मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात माहिती देताना सांगितलं की, "बाथरुममध्ये घसरुन पडल्यामुळे मंजुळाच्या अंगावर खुणा होत्या’. पोलिसांचा हा अजब दावा ऐकून पोलिसांनी चांगलंच झापलं आणि ‘इतर प्रकरणातही दोषींना वाचवण्यासाठी अशीच मदत करता का?’ असा थेट सवालही क्राईम ब्रांचला विचारला.
आणखी वाचा
24 जून रोजी मंजुळे शेट्येचा मृत्यू झाला होता. अधिका-यांच्या मारहाणीनंतर मंजुळे शेट्येचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणात शवविच्छेदन अहवालामुळे नवा खुलासा झाला होता. मंजुळाच्या शरीरावर चार अंतर्गत आणि बाह्य जखमा आढळल्या असून, तिच्यावर अनन्वित अत्याचार करत मारहाण करण्यात आल्याचंही उघड झालं होतं.
अंडी व पावाच्या हिशेबावरून मंजुळाला अमानुष मारहाण करण्यात आली, त्यातच तिचा मृत्यू झाला. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त दिले होते. त्यानंतर राज्य महिला आयोगाने प्रकरणाची दखल घेतली. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर म्हणाल्या, सकृतदर्शनी हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे आहे".
तर दुसरीकडे मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीने सत्र न्यायालयात धक्कादायक माहिती दिली होती. कैदी मंजुळा शेट्येवर पाशवी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती इंद्राणी मुखर्जीने दिली होती. तसंच मंजुळा शेट्येच्या गळ्याला ओढणी आवळून मारहाण केली. इतकंच नाही तर मंजुळा शेट्येच्या गुप्तांगावर काठीनं हल्ला करण्यात आल्याचा दावा इंद्राणी मुखर्जीने केला होता. शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीवर मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी भायखळा कारागृहात दंगल केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर इंद्राणीने कारागृह प्रशासनाने मारहाण केल्याचा दावा करत विशेष सीबीआय न्यायालयात धाव घेतली.
विदर्भातील कारागृहांना सूचना-
या प्रकरणामुळे राज्यातील कारागृह प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूर विभागाच्या कारागृहाचे विशेष उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी विदर्भातील सर्व कारागृहाच्या अधिका-यांना खास निर्देश दिले आहेत. महिला कैद्यांच्या अडचणी समजून घ्या, त्यांच्या सुरक्षेसंबंधाने योग्य उपाययोजना करा, त्यांची काळजी घ्या, असे सूचनापत्रही त्यांनी दिले आहे. विशेष म्हणजे, नागपूर विदर्भातील विविध कारागृहात महिला कैद्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यात नागपूर आणि अमरावती कारागृहात २०० पेक्षा जास्त महिला कैदी आहेत.