Manikrao Kokate PC News: माझा व्हिडिओ कोणी समोर आणला किंवा कोणी काढला, याच्याशी माझे घेणेदेणे नाही. सभापती या प्रकरणी चौकशी करतीलच. त्यात एवढे विशेष काही नव्हते. जेणेकरून शेतकऱ्यांच्या भावना दुखावतील किंवा छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावतील, असे काहीही नव्हते. मी शेतकऱ्यांच्या संदर्भात एवढे निर्णय घेतले, त्याबाबत कुणीही भाष्य केलेले नाही. ज्याचा शेतकऱ्यांशी संबंध नाही, अशा गोष्टी मीडियात दाखवल्या गेल्या, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे. माणिकराव कोकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना पुन्हा एकदा विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना उत्तर दिले.
माणिकराव कोकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या प्रकरणात जे दोषी असतील, त्या सर्वांचे सीडीआर चेक करावे. यामागील सूत्रधार कोण आहे, कोणी यात भाग घेतलेला आहे, या सगळ्याची चौकशी एकदा होऊन जाऊ द्या. वारंवार मीडियाच्या समोर आणले जात आहे, त्यासंदर्भातील चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे.
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
राजीनामा देण्यासारखे घडले काय?
प्रश्न असा आहे की, राजीनामा देण्यासारखे घडले काय? मी काय कोणाचा विनयभंग केला का? मी चोरी केली का? शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतले का? माझी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? एक व्हिडिओ, जो विरोधकांनी काढला, त्यांना तर मी कोर्टात खेचून अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार, त्यांनी माझी बदनामी केली आहे, असे माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टपणे सांगितले. विरोधक काय बोलतात, याच्याशी घेणेदेणे नाही. पण जे विरोधक रमी खेळण्याच्या संदर्भात बोलले, त्या सर्व विरोधकांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्याशिवाय राहणार नाही. विरोधक किंवा ज्यांच्याकडे जितका मोठा व्हिडिओ असेल, तो जरूर समोर आणावा. मी कोर्टात जाणारच आहे, तो व्हिडिओ त्यांना कोर्टात दाखवावा लागेल. मी त्याची सविस्तर चौकशी लावणार आहे. मी ऑनलाइन रमी खेळत होतो का, माझा मोबाइल नंबर, माझा सीडीआर, माझ्या बँकेच्या खात्यांची माहिती, सगळे त्याच्याशी लिंक आहे का, हे सगळे चौकशीतून बाहेर येईल. या चौकशीचा रिपोर्ट नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पटलावर ठेवतील, यात दोषी सापडलो, तर त्याच क्षणी एका सेकंदात राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देईन, असे सांगून माणिकराव कोकाटे यांनी विरोधकांना आव्हान दिले.
दरम्यान, या प्रकरणी माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आलेली नाही. त्यांच्याकडून तशी विचारणाही झालेली नाही. त्यामुळे त्यांचा तसा समज होणे सहाजिक आहे. मीडियावर विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांनी विधान केले. मी रमी खेळलो नाही आणि रमी खेळणे योग्यही नाही. मी गेली २५ वर्षे विधानसभेत आहे. विधानसभेचे नियम, कायदे मला सगळे समजतात. विधानसभा, विधान परिषद यामध्ये नेमके काय करावे, काय करू नये, याच्या नियमाची मला पूर्णपणे काळजी आहे. गेली २५ वर्षे मी हे नियम पाळतो. आताही मी नियम पाळले आहेत. १०-१२ सेकंदाच्या व्हिडिओ आला. गेम स्कीप होऊ शकला नाही, हा एकच विषय आहे आणि अनावश्यक मीडिया तसेच विरोधकांनी तो लावून धरला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगण्याची आवश्यकता नाही. मुळात वादंग कोणी उठवला, वादंग होण्यासारखे झाले काय, अनावश्यक गंभीरता निर्माण करण्यात आली. सगळ्यांचे सीडीआर चेक करायचे आहेत, या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे, कोणाला यांचे फोन जातात, कोणामुळे मला टार्गेट केले जात आहे, हे पाहायचे आहे. यामुळे माझा पक्ष अडचणीत येत नाही. माझा पक्ष उत्कृष्ट काम करत आहे, असेही माणिकराव कोकाटे म्हणाले.