मंगळसूत्र शोधण्यासाठी उपसला तलाव!
By Admin | Updated: June 5, 2015 01:57 IST2015-06-05T01:57:02+5:302015-06-05T01:57:02+5:30
पाण्यात पडलेले मंगळसूत्र शोधण्यासाठी पतीने चक्क संपूर्ण तलावच रिकामा केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी कामापूर गावात घडला़

मंगळसूत्र शोधण्यासाठी उपसला तलाव!
नरेंद्र जावरे ल्ल चिखलदरा
(जि. अमरावती)
पत्नीच्या प्रेमापोटी शहाजहानने ताजमहाल बांधला़ पत्नीवरील प्रेम दाखवणारी अशी अनेक उदाहरणे इतिहासात आढळून येतात़ पण पाण्यात पडलेले मंगळसूत्र शोधण्यासाठी पतीने चक्क संपूर्ण तलावच रिकामा केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी कामापूर गावात घडला़ एवढे करूनही मंगळसूत्र काही सापडले नाही, पण तलाव मात्र रिकामा झाला आणि पतीवर फरार होण्याचा बाका प्रसंग ओढवला़
चिखलदरापासून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावरील कामापूर या गावात रामू शिकारी बेलसरे हा पत्नीसह राहतो़ गावात वनविभागानेनाल्यावर लहान तलाव बांधला आहे. या तलावात आदिवासीबांधव मासेमारी करतात़ हेच पाणी गावकरी पिण्यासाठीही वापरतात. रामू बेलसरे हा बुधवारी पत्नीसह तलावावर मासेमारीसाठी गेला. रामू मासेमारी करीत असताना त्याची पत्नी तलावाच्या कडेला कपडे धूत होती. दरम्यान, खाली वाकल्याने तिचे मंगळसूत्र तलावात पडले. ही बाब लक्षात येताच या दाम्पत्याने शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले़ पण, मंगळसूत्र काही सापडले नाही. अखेर रामूने परिसरातीलच एका शेतातील डिझेल इंजिन आणून तलावातील पाण्याचा उपसा सुरू केला़ ते पाणी नाल्यात सोडले़ शेतात ओलितासाठी पंप लावला असेल असे वाटल्याने त्याकडे कुणी लक्ष दिले नाही. मात्र, संपूर्ण तलाव रिकामा झाल्यानंतर ही बाब उघड झाली आणि एकच खळबळ उडाली. रामू बेलसरेच्या प्रतापाची चर्चा वनाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. वनकर्मचाऱ्यांनी तलावाचा पंचनामा करून रामूची शोधमोहीम सुरू केली़ परिणामी, रामूवर फरार होण्याची वेळ आली़
च्कामापूर वन व्यवस्थापन समितींतर्गत हा ‘चेक डॅम’ तयार करण्यात आला. त्याची देखरेख समिती करते. उन्हाळ्यात पाण्याची सर्वाधिक गरज असताना रामू बेलसरे याने केलेले कृत्य गंभीर आहे. त्यामुळे समिती व वन कर्मचाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. घटनेचा पंचनामा केला.
या विचित्र प्रकाराचा वन कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. हा तलाव पुन्हा भरण्यात आला आहे. उन्हाळ्यात गावकरी व वन्य प्राण्यांसाठी हा तलाव बहुउपयोगी ठरतो.
- एस. युवराज, उपवनसंरक्षक, पूर्व मेळघाट वन विभाग, चिखलदरा
पावसाळ्यात टेकडीवरील वाहते पाणी याच तलावात साचते. डिझेल पंपाद्वारे रिकामा केलेला हाच तो ‘चेक डॅम’.