मानकापूर रेल्वेगेट अखेर उघडले
By Admin | Updated: January 21, 2015 00:24 IST2015-01-21T00:24:39+5:302015-01-21T00:24:39+5:30
मानकापूर रेल्वे फाटक सुरू करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्यानंतर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने हे फाटक सुरू करण्यासाठी कागदोपत्री कारवाई पूर्ण केली. ‘कमिश्नर आॅफ

मानकापूर रेल्वेगेट अखेर उघडले
नागरिकांना दिलासा : गडकरींनी दिले होते आदेश
नागपूर : मानकापूर रेल्वे फाटक सुरू करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्यानंतर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने हे फाटक सुरू करण्यासाठी कागदोपत्री कारवाई पूर्ण केली. ‘कमिश्नर आॅफ रेल्वे सिक्युरीटी’ यांच्याकडून हे गेट उघडण्याची परवानगी मिळाल्यामुळे आज २० जानेवारीला हे रेल्वेगेट वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. दरम्यान मानकापूर परिसरातील नागरिकांनी हे रेल्वेगेट वाहतुकीसाठी खुले होताच आनंदोत्सव साजरा केला.
मानकापूर येथे रेल्वे ओव्हरब्रीज बांधल्यामुळे तेथील रेल्वे फाटक वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. हे फाटक वाहतुकीसाठी बंद झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे हे फाटक सुरू करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी मागील चार महिन्यांपासून साखळी उपोषण सुरू केले होते. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांच्या उपोषण मंडपाला भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना हे फाटक सुरू करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने हे फाटक सुरू करण्यासाठी कागदोपत्री कारवाई करून ‘कमिश्नर आॅफ रेल्वे सिक्युरिटी’ यांना पत्र पाठवून हे रेल्वेगेट सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांची परवानगी मिळताच हे गेट आज वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. गेट खुले झाल्यामुळे मानकापूर परिसरातील जवळपास ३० हजार नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मानकापूर गेटजवळ नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या वतीने ‘लिमिटेड हाईट सब वे’ तयार करण्यात येणार आहे. रेल्वेने ‘लिमिटेड हाईट सब वे’ तयार करण्यासाठी नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाला परवानगी दिली आहे. या ‘सब वे’ साठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी निधी उपलब्ध करून देणार आहेत. दरम्यान हे गेट वाहतुकीसाठी खुले झाल्यामुळे मानकापूर परिसरातील नागरिकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आभार मानून आनंदोत्सव साजरा केला. (प्रतिनिधी)