मुंबईत रंगणार मालवणीचो जागर
By Admin | Updated: April 3, 2017 23:31 IST2017-04-03T23:31:16+5:302017-04-03T23:31:16+5:30
मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी व्यापक प्रयत्न करण्यासाठी माझा सिंधुदुर्ग या फेसबूक ग्रुपने पुढाकार घेतला आहे

मुंबईत रंगणार मालवणीचो जागर
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - कोकण म्हटलं की समुद्रकिनारे, डोंगरदऱ्या अशा निसर्गसौंदर्याबरोबरच आपल्या नजरेसमोर येते ती मालवणी भाषा. नाटक, सिनेमा आणि मालिकांमधून सर्वांच्याच परिचयाच्या झालेल्या मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी व्यापक प्रयत्न करण्यासाठी माझा सिंधुदुर्ग या फेसबूक ग्रुपने पुढाकार घेतला आहे.
४3,००० पेक्षा जास्त फेसबूक सदस्य असलेल्या या फेसबुक ग्रुपच्यावतीने नवीन पिढी आणि खास करून शहरातील मालवणी चाकरमान्यांमध्ये मालवणी भाषेचे संवर्धन व आपली बोलीभाषा टिकवण्याच्या उद्देशाने "जागर मालवणीचो" हा कार्यक्रम रविवार दि. ९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. ठाण्यातील भारतीय स्त्री जीवन विकास परिषद मंदिर सभागृह , ठाणे येथे हा कार्यक्रम आयोजित होणार आहे. यावेळी सिंधुदुर्गातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मालवणी भाषेवर आधारीत मार्गदर्शन , मालवणी भाषा टिकवण्यासाठीचे प्रबोधन , नव्या पिढीला दैनंदिन जीवनात मालवणी भाषा वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच माझा सिंधदुर्ग ग्रुप मधील विविध क्षेत्रातील कलाकारांसाठी "मालवणी कला प्रदर्शन " , महिलावर्गासाठी "खेळ पैठणीचो , अभिमान मालवणीचो" हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे . तरी मुंबई -पुण्यात राहणाऱ्या बहुसंख्य चाकरमान्यांनी या अस्सल मालवणी ढंगाच्या रसाळ कार्यक्रमाच्या मेजवानीचा आनंद घ्यावा व मालवणी च्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक - अॅडमिन विकास पालव यांनी केले आहे .