मालवण किनारपट्टी ‘हाऊसफुल्ल’
By Admin | Updated: November 11, 2015 00:16 IST2015-11-10T21:25:50+5:302015-11-11T00:16:11+5:30
सुविधांकडे दुर्लक्ष : तारकर्ली एमटीडीसी, हॉटेल्सचे ३० नोव्हेंबरपर्यंत बुकिंग

मालवण किनारपट्टी ‘हाऊसफुल्ल’
सिद्धेश आचरेकर -- मालवण पर्यटन हंगामाची सलामी धीम्यागतीने झाली असली तरी दिवाळी सुट्टी कालावधीत अपेक्षित पर्यटन वाढणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पर्यटन स्थळांच्या ठिकाणी म्हणावी तशी पर्यटकांची वर्दळ नसली तरी नोव्हेंबर महिन्यात आगाऊ बुकिंग झाले असल्याने १० ते ३० नोव्हेंबरपर्यंत तारकर्ली एमटीडीसी तसेच मालवण शहर तसेच तारकर्ली देवबाग याठिकाणचे खासगी लॉज व हॉटेल्स ‘हाऊसफुल्ल’ असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे बुकिंग न करता येणाऱ्या पर्यटकांची काही प्रमाणात तारांबळ उडण्याची शक्यता आहे. जागतिक पर्यटनाचा ‘हॉटस्पॉट’ असलेले किल्ले सिंधुदुर्ग पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. त्याचप्रमाणे येथील स्वच्छ सुंदर किनारेही लक्ष वेधून घेत आहेत. पर्यटकांच्या आदरातिथ्यासाठी पर्यटन व्यावसायिक सज्ज झाले आहे. दिवाळी पर्यटन हंगामाला राज्यभरासह देशी-विदेशी पर्यटकांनी मालवण, तारकर्ली, देवबागला सर्वाधिक पसंती दिली आहे. दिवाळी सुट्टी आणि सलग जोडून आलेल्या सार्वजनिक सुट्ट्या असल्याने गेल्या आठवड्याभरात आगाऊ बुकिंग ‘फुल्ल’ झाले आहे. पर्यटकांच्या आगाऊ बुकिंगनंतर हंगामाची आश्वासक सुरुवात होणार असल्याचे पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले. किनारपट्टी आगामी महिनाभर गर्दीने तुडुंब राहणार आहे.
सुविधांचा बोजवारा : चेंजिंग रूमची मागणी
मालवणात पर्यटन हंगामात सुविधांची वानवा सर्वत्र दिसून येते. पर्यटन हंगाम वाढला की मोठी डोकेदुखी असते ती वाहतूक कोंडीची. वाढते पर्यटन व अरुंद रस्ते यामुळे वाहतूक कोंडी झाली तर वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. मालवण बंदर जेटीवरून किल्ले सिंधुदुर्ग दर्शन करता येते. मात्र, बंदर जेटी येथे पर्यटकांना सावली मिळण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात आलेली नाही. दुपारचे तापमान वाढल्याने उन्हाचा प्रतिकार करणे असह्य आहे.
उन्हाचे चटके खात किल्ले सिंधुदुर्गची भ्रमंती करावी लागत आहे. पर्यटकांच्या सुविधेसाठी जेटीवर सावली येण्यासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे. किनारपट्टीवर शौचालये, प्रसाधनगृह यांची संख्या अपुरी आहे. महिलांसाठी चेंजिंग रूम आदींची सुविधा देण्यात यावी, अशी मागणी पर्यटनप्रेमींतून होत आहे.
मच्छी थाळी दर
पापलेट : ३०० ते ३५० (फ्राय : २४०)
सुरमई : ३०० ते ३५० (फ्राय : २३०)
कोळंबी : ३०० ते ३५० (फ्राय : १५०)
सरंगा : २०० ते २५० (फ्राय : १३०)
बांगडा : १५० (फ्राय : ६०)
मोरी : १५०
कालवा : १५०
सागरी पर्यटन आकर्षण
गतवर्षी दिवाळी हंगामात २५ हजाराहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली होती. यावषीर्ही आगाऊ बुकिंगचा विचार करता पर्यटकांची संख्या वाढणार आहे. मालवणात तालुक्यात असलेल्या कृषी पर्यटनाकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. घुमडे, हडी, काळसे, धामापूर आदी गावातही पर्यटक हजेरी लावत आहेत.