मल्ल्याच्या जेटचा लिलाव रद्द
By Admin | Updated: September 27, 2016 00:37 IST2016-09-27T00:37:12+5:302016-09-27T00:37:12+5:30
किंगफिशर एअरलाइन्सचा अध्यक्ष विजय मल्ल्याच्या खासगी जेटची यशस्वी बोली लावणाऱ्या एसजीआय कॉमेक्स या कंपनीने अखेर लिलावातून माघार घेतली. त्यामुळे सोमवारी उच्च

मल्ल्याच्या जेटचा लिलाव रद्द
मुंबई : किंगफिशर एअरलाइन्सचा अध्यक्ष विजय मल्ल्याच्या खासगी जेटची यशस्वी बोली लावणाऱ्या एसजीआय कॉमेक्स या कंपनीने अखेर लिलावातून माघार घेतली. त्यामुळे सोमवारी उच्च न्यायालयाने या लिलावासाठी नव्याने प्रक्रिया पार पाडण्याचा आदेश दिला. विजय मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्सकडून ५०० कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी २०१३मध्ये सेवाकर विभागाने मल्ल्याचे खासगी जेट जप्त केले.
एसजीआय कॉमेक्सने या कंपनीने जेटची बोली २७. ३९ कोटी रुपये लावून आपण या लिलावात यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. मात्र एसजीआयने राखीव किमतीच्या ८१.८ टक्के कमी बोली लावल्याचा दावा सेवा कर विभागाने केला आहे. त्यामुळे हा लिलाव रद्द करण्यात यावा, अशी मागणी सेवा कर विभागाने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली. तर दुसरीकडे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण लि.नेही हँगिग चार्जेस मिळवण्यास कोर्टात धाव घेतली आहे. मल्ल्याचे खासगी जेट आॅक्टोबर २०१२पासून विमातळावर उभे असल्याने त्याचे हँगिग चार्जेस देण्यात यावेत, अशी मागणी विमानतळ प्राधिकरणाने याचिकेद्वारे केली आहे. या याचिकांवरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे होती. सोमवारच्या सुनावणीत एसजीआय कॉमेक्सच्या वकिलांनी कंपनी या लिलावातून माघार घेत असल्याचे खंडपीठाला सांगितले. मात्र नव्याने पार पाडण्यात येणाऱ्या लिलावात आवश्यकता वाटल्यास आम्हीही सहभागी होऊ, असे कंपनीने न्यायालयाला सांगितले. (प्रतिनिधी)
न्यायालयाने एसजीआय कॉमेक्स कंपनीला नव्याने पार पाडण्यात येणाऱ्या लिलावात भाग घेण्याची मुभा दिली. मल्ल्याला भाडेतत्त्वावर जेट देणाऱ्या सी. जे. लिजिंग कंपनीला एका नव्या एजन्सीकडून लिलाव पार पाडण्याचे निर्देश दिले.
अशी एजन्सी शोधा की ज्याच्यावर सकारचे किंवा अन्य संस्थेचे नियंत्रण नाही. संबंधित एजन्सी पूर्णपणे स्वतंत्र असली पाहिजे, असे म्हणत खंडपीठाने सी. जे. लिजिंग या कंपनीला
६ आॅक्टोबरपर्यंत अशा एजन्सीचे नाव सादर करण्याचे निर्देश दिले.