Malegaon Bomb Blast 2008 Marathi: २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष ठरवले. संशयापलिकडे दोष सिद्ध करू शकले नाही, असे सांगत न्यायालयाने हा निकाल दिला. न्यायालयाने दिलेल्या या निकालावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या असून, शिवसेनेचे (युबीटी) खासदार अनिल देसाई यांनी तपासाबद्दलच शंका व्यक्त केल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१७ वर्षानंतर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात महत्त्वाचा निकाल विशेष एनआयए न्यायालयाने दिला. न्यायालयाने माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींना निर्दोष ठरवत मुक्त केले.
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार देसाई काय बोलले?
"हे दुसरं प्रकरण आहे. मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना जशा पद्धतीने मुक्त करण्यात आले, त्याच प्रकारे मालेगाव प्रकरणातही. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की, सरकारी वकिलांनी काय केले? कशाप्रमारे त्यांनी तपास केला, चौकशी केली. त्यांनी पुरावे शोधले का?", असे खासदार अनिल देसाई म्हणाले.
...तर हे दुर्दैवी आहे -खासदार देसाई
"सरकारी पक्षाने कशा पद्धतीने म्हणणं मांडलं? कारण न्यायालय असे म्हणत असेल की, आरोप संशयापलीकडे सिद्ध झालेले नाहीत. मग आरोपींना निर्दोष सोडले जाते. जर तपास यंत्रणा निःसंशयपणे, शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर हे दुर्दैवी आहे", असे भाष्य खासदार अनिल देसाई यांनी केले.
"सुरक्षेवर लोकांचा विश्वास असतो की, भारताचा नागरिक म्हणून मी माझ्या परिसरात सुरक्षित आहे. सुरक्षा व्यवस्था इथे चांगली आहे. सरकार आणि सरकारबरोबरच ज्या सुरक्ष यंत्रणा आहेत, त्या त्यांचं काम व्यवस्थित करत आहेत. पण, असं घडत असेल, तर मग जे निष्पाप लोक मारले गेले, त्यांचे कुटुंबीय काय विचार करतील आणि कशा पद्धतीची कायदा आणि सुव्यवस्था आहे?", असे अनिल देसाई म्हणाले.