हिवताप-गॅस्ट्रोने ८,१३६ रुग्ण हैराण
By Admin | Updated: November 8, 2014 04:14 IST2014-11-08T04:14:41+5:302014-11-08T04:14:41+5:30
डेंग्यू या साथीच्या आजाराने जिल्हाभरात सुमारे ५२५ रुग्ण हैराण असतानाच गॅस्ट्रो, हिवताप, अतिसार, हगवण, कावीळ, विषमज्वर

हिवताप-गॅस्ट्रोने ८,१३६ रुग्ण हैराण
सुरेश लोखंडे, ठाणे
डेंग्यू या साथीच्या आजाराने जिल्हाभरात सुमारे ५२५ रुग्ण हैराण असतानाच गॅस्ट्रो, हिवताप, अतिसार, हगवण, कावीळ, विषमज्वर, गोवर इत्यादी साथीच्या आजारांनी ठाणे, पालघर जिल्ह्यांत डोके वर काढले आहे़ येथील शहरी व ग्रामीण भागांत आतापर्यंत सुमारे ८ हजार १३६ रुग्ण या आजारांनी त्रस्त आहेत. यातील हिवतापाने तिघांचा मृत्यू झाला असून, दोघे डेंग्यूने दगावले आहेत़
जिल्हा शासकीय रुग्णालयासह त्यांच्या नियंत्रणातील ६ रुग्णालये, तर जिल्हा परिषदेची सुमारे ६५ प्राथमिक आरोग्य केंदे्र आणि महापालिका रुग्णालय परिसरात सुमारे १० हजार रुग्णांपेक्षा जास्त रुग्ण गॅस्ट्रो, हिवताप, अतिसार, हगवण, कावीळ इत्यादी साथीच्या आजारांनी हैराण आहेत. परंतु, प्राप्त अहवालानुसार शासकीय रेकार्डवर सुमारे ८ हजार १३६ रुग्ण मागील चार महिन्यांपासून आतापर्यंत साथीच्या आजारांनी जर्जर आहेत. तरीही, सद्य:स्थितीला जिल्ह्यात कोठेही साथीचा उद्रेक नसून प्रत्येक रुग्णालयात एक-दोन तापाचे रुग्ण उपचार घेत असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे़
साथीच्या आजारांसह डेंग्यूच्या तापाने सुमारे ५२५ रुग्ण फणफणत असून, यापेक्षा तिप्पट रुग्ण डेंग्यूचे संशयित म्हणून उपचार घेत आहेत. डेंग्यूमुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. यातील दोघे मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील असले तरी मृतांमधील एक डेंग्यूचा संशयित असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, ठाणे महापालिकेच्या परिसरात एकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे.
या साथीच्या आजाराने मुंबई, ठाण्यासह अख्खा महाराष्ट्र तापला आहे. यामध्ये ठाणे-पालघर जिल्ह्यांचादेखील समावेश आहे. यानुसार, ठाणे शहरासह मीरा-भार्इंदर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली मनपाचा काही भाग, भिवंडी तालुक्यातील खारबाव परिसर तर मुरबाड आणि शहापूर तालुक्यांतील काही नागरी भागांस अतिसंवेदनशील म्हणून घोषित केले आहे.