मुंबईचे प्रकल्प तातडीने करा
By Admin | Updated: November 8, 2014 03:51 IST2014-11-08T03:51:24+5:302014-11-08T03:51:24+5:30
मुंबईतील वाहतुकीच्या जटील समस्येवर उपाय असलेले सर्व पायाभूत सुविधांचे प्रकल्प नियोजनबद्ध रीतीने कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावेत व नागरिकांना दिलासा

मुंबईचे प्रकल्प तातडीने करा
मुंबई : मुंबईतील वाहतुकीच्या जटील समस्येवर उपाय असलेले सर्व पायाभूत सुविधांचे प्रकल्प नियोजनबद्ध रीतीने कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावेत व नागरिकांना दिलासा द्यावा, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना दिले. मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
राज्यातील प्रलंबित पायाभूत प्रकल्पांबाबत मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त यू. पी. एस. मदान, सिडकोचे संजय भाटिया, परिवहन विभागाचे प्रधान सचिव शैलेशकुमार शर्मा आदी बैठकीला उपस्थित होते.
एमएमआरडीएमार्फत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो लाइन २ व मेट्रोलाइन ३ या प्रकल्पांची सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. या वेळी एमएमआरडीएचे मदान यांनी शिवडी ते चिर्ले हा ट्रान्सहार्बर लिंक उपयुक्त ठरेल, असे सांगितले. चारकोप-वांद्रे-नामखुर्द हा इलेव्हेटेड मेट्रो प्रकल्प आता चारकोपच्या पुढे दहिसरपर्यंत विस्तारित केल्याचे सांगण्यात आले. या प्रकल्पाचा जवळपास १६ लाख प्रवाशांना फायदा होणार आहे, तर मेट्रो ३ हा कुलाबा ते वांद्रे असा पूर्णत: भुयारी मार्ग असेल. ३२.५ कि.मी. लांबीच्या प्रकल्पात २७ स्टेशन्स असतील. नरिमन पॉइंट, कफ परेड, काळबादेवी तसेच विमानतळ या ठिकाणीही या प्रकल्पाची स्टेशने असून वाहतूक खोळंबा टाळण्यास त्याची मदत होईल, असे स्पष्ट केले.
एमएसआरडीसीतर्फे मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावरील जलवाहतूक प्रकल्प फेरी व्हार्फ (भाऊचा धक्का) ते नेरळ व मांडवा याबरोबरच पश्चिम किनाऱ्यावरील प्रवासी जलवाहतूक प्रकल्पाचेही सादरीकरण करण्यात आले. जलवाहतुकीचा प्रकल्प ५६८ कोटींचा आहे. सिडकोचे संजय भाटिया यांनी नवी मुंबईतील विमानतळ प्रकल्पासाठी ७५ टक्के जमीन संपादित झाली असून, उर्वरित जमिनीसाठी कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)