राज्यात दारूबंदी करा - तृप्ती देसाई
By Admin | Updated: May 17, 2016 06:06 IST2016-05-17T06:06:11+5:302016-05-17T06:06:11+5:30
सरकारने महाराष्ट्रात दारूबंदी करावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सोमवारी येथे केली

राज्यात दारूबंदी करा - तृप्ती देसाई
इचलकरंजी (जि. कोल्हापूर) : दारुमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. महिलांवर अत्याचारात वाढ
होत आहे. यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्रात दारूबंदी करावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा
तृप्ती देसाई यांनी सोमवारी येथे केली. राज्यात दारूबंदी झाली तर महिलांना अच्छे दिन येतील असेही त्या म्हणाल्या.
बावणे गल्लीतील देशी दारू दुकान हलविण्यासाठी सुरू असलेल्या महिलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देसाई इचलकरंजीत आल्या होत्या. हे देशी दारुचे दुकान भरवस्तीत असून तळीरामांमुळे महिलांना तसेच लहान मुलांना त्रास होतो. राज्य शासनाने हे दारू दुकान या वस्तीतून हलवावे, अशी मागणी या परिसरातील महिलांनी गेल्या पंधरा दिवसांपासून लावून धरली आहे.
काल, रविवारी आंदोलनकर्त्या महिलांनी दारू पिण्यासाठी आलेल्या दोघा तळिरामांची धुलाई केली होती. या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला आपला पाठिंबा असून, जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत हे दुकान येथून हलवावे. आठ दिवसांत दुकानाचे स्थलांतर न केल्यास भूमाता ब्रिगेडच्या वतीने दुकानाला टाळे ठोकणार, असा इशाराही देसाई यांनी या वेळी दिला. (वार्ताहर)