पानसरे हल्ल्यातील मारेकऱ्यांचे रेखाचित्र तयार

By Admin | Updated: February 19, 2015 23:39 IST2015-02-19T23:10:24+5:302015-02-19T23:39:17+5:30

महत्त्वाचे धागेदोरे हाती : गारगोटीतील तरुण चौकशीसाठी ताब्यात

Make a drawing of the killers of Pansare attack | पानसरे हल्ल्यातील मारेकऱ्यांचे रेखाचित्र तयार

पानसरे हल्ल्यातील मारेकऱ्यांचे रेखाचित्र तयार

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावरील खुनी हल्ल्यातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणी बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी गारगोटीतील संशयित तरुणास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मारेकऱ्यांना प्रत्यक्षदर्शी पाहिलेल्या बारा वर्षांच्या मुलाच्या माहितीवरून हल्लेखोरांचे रेखाचित्र पोलिसांनी तयार केले आहे. या प्रकरणाचा तपास अत्यंत गोपनीयपणे सुरू आहे. हल्ल्यातील कांही कडी उलगडण्यात पोलिसांना यश आल्याचे दिसते आहे. पानसरे दाम्पत्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांच्या शोधासाठी मुंबई क्राईम ब्रँच, दहशतवादविरोधी पथक अशी सुमारे वीस विशेष पथके रात्रंदिवस काम करत आहेत. हा हल्ला सामाजिक, राजकीय, वैयक्तिक, कौटुंबिक व आर्थिक वादातून हल्ला झाला आहे का?, पानसरे हे विविध संघटनांवर काम करत असल्याने त्यांचे कोणाशी हेवेदावे होते का? कामगार चळवळीच्या माध्यमातून ‘गोकुळ’ आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातूनही कोणाची मने दुखावली आहेत का? अशा विविध अंगांनी पोलिसांचा तपास सुरू आहे. पानसरे यांचे गेल्या दोन महिन्यांमध्ये कुठे कार्यक्रम झाले होते, याचीही माहिती पोलीस घेत आहेत. नागपूर व सावंतवाडी येथे त्यांची व्याख्याने झाली होती. आतापर्यंत पोलिसांनी करवीरचे नायब तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह ६० लोकांचे जबाब घेतले आहेत.
हल्ल्याच्या काही वेळांपूर्वी पानसरे दाम्पत्य नाष्टा करण्यासाठी जाताना दोघा तरुणांनी उमा पानसरे यांना ‘पानसरे कुठे राहतात’ अशी विचारणा केली. यावेळी एक-दोन मिनटे त्यांच्याशी चर्चाही केली. त्यानंतर नाष्टा करून परत येत असताना पत्ता विचारणाऱ्या तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला, अशी माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे.या तरुणांनी मराठीतच पत्ता विचारल्याचे सूत्रांकडून समजते. तपासामधील काही महत्त्वाच्या धाग्यादोऱ्यांवरून पोलिसांनी गारगोटीच्या तरुणाला बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेऊन चौकशी सुरू ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. मारेकऱ्यांना प्रत्यक्ष पाहणाऱ्या शाळकरी मुलाच्या जबाबावरून पोलिसांनी त्यांची चार-पाच रेखाचित्रे बनविली आहेत. ती पानसरे दांपत्यास दाखविण्यासाठी गुरुवारी दुपारी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा रुग्णालयात गेले होते. यावेळी त्यांनी जखमी उमा पानसरे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या बोलण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यांचा जबाब आणि मारेकऱ्यांचे रेखाचित्र त्यांना दाखविणे आवश्यक आहे.
त्या दोघांनी या रेखाचित्रांना संमती दिल्यानंतरच ती पोलिसांकडून प्रसिध्दीस दिली जाणार आहेत. त्यामुळे पोलिसांचे एक विशेष पथक त्यांच्याशी बोलण्यासाठी रुग्णालयातच तळ ठोकून आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास तपास अधिकारी अंकित गोयल यांनी पानसरे यांच्या बंगल्याची पाहणी केली. यावेळी महत्त्वाची कागदपत्रे, ते वाचत असलेली पुस्तके, त्यांनी लिहिलेल्या डायऱ्या, पुस्तके, संग्रहित फायली आदींची बारकाईने पाहणी केली.

मोबाईल कॉल्सची छाननी
पानसरे खुनी हल्ल्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक तांत्रिक पद्धत अवलंबली आहे. पानसरे यांच्या निवासस्थान परिसरातील सर्व कंपन्यांच्या मोबाईल टॉवरचे लोकेशन तपासले जात आहे. हल्ल्यापूर्वी व नंतर कोणाकोणांचे कॉल्स आले-गेले याची माहिती पोलीस घेत आहेत. मोबाईल टॉवरचे लोकेशन पाहण्यासाठी मुंबईहून आलेल्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे पथका मुख्यालयातील सायबर सेलमध्ये बसून आहे.


बेवारस तीन मोटारसायकली जप्त
हल्ल्याचा तपास करत असताना शहरात तीन मोटारसायकली बेवारस स्थितीत मिळाल्या आहेत. हल्लेखोरांनी काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल वापरल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांना सापडलेल्या मोटारसायकलीमध्ये एक पल्सरही आहे परंतु तिच मोटारसायकल आहे का हे अद्याप सिद्ध करता आलेले नाही.

Web Title: Make a drawing of the killers of Pansare attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.