स्थलांतरित विद्यार्थ्यांना आणणार मुख्य प्रवाहात

By Admin | Updated: October 5, 2015 03:40 IST2015-10-05T03:40:45+5:302015-10-05T03:40:45+5:30

ऊसतोडणी कामगाराच्या विजय या मुलाचे इयत्ता पाचवीचे शिक्षण सुरू असतानाच कुटुंबाने सोलापुरातून सांगलीत स्थलांतर केले. विजयचे शिक्षणमध्येच थांबले...

Main stream to bring immigrant students | स्थलांतरित विद्यार्थ्यांना आणणार मुख्य प्रवाहात

स्थलांतरित विद्यार्थ्यांना आणणार मुख्य प्रवाहात

संदीप प्रधान, मुंबई
ऊसतोडणी कामगाराच्या विजय या मुलाचे इयत्ता पाचवीचे शिक्षण सुरू असतानाच कुटुंबाने सोलापुरातून सांगलीत स्थलांतर केले. विजयचे शिक्षणमध्येच थांबले... वीटभट्टीत दिवसरात्र राबणाऱ्या कुटुंबातील सुमन चौथीत असताना कुटुंबाने पोटापाण्याकरिता शहराकडे जाण्याचा निर्णय घेतला. सुमनची शिक्षणाची हौस तेथेच संपली... अशा सुमारे ७० हजार स्थलांतरित मुला-मुलींचे शिक्षण मध्येच थांबू नये याकरिता त्यांना ‘शिक्षण हमीपत्र’ देऊन त्यांचे सॉफ्टवेअरद्वारे ट्रॅकिंग करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची योजना अंमलात येऊ घातली आहे.
शिक्षण हक्क कायद्यात स्थलांतरितांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडण्याचा मोठा अडसर असल्याने ऊसतोडणी कामगार, वीजभट्टी कामगार, दगड-खाण कामगार, बांधकाम मजूर अशा किमान आठ प्रकारच्या मोलमजुरीकरिता पाठीवर बिऱ्हाड घेऊन फिरणाऱ्यांच्या मुलांचे सरकारने सर्वेक्षण केले. अशा कुटुंबातील शाळेत जाण्यायोग्य मुला-मुलींची संख्या ७० हजारांच्या घरात आहे.
स्थलांतरित मुलांची नोंदणी करून त्यांना ‘शिक्षण हमीपत्र’ देण्यात येणार आहे. ज्याची नोंद सरकारकडील एका सॉफ्टवेअरवर असेल. एखाद्या विद्यार्थी-विद्यार्थिनीच्या पालकांनी स्थलांतर केले व त्याचे शिक्षण थांबले तर लागलीच ते ज्या शाळेत जात होते त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी तशी नोंदणी करून सरकारला माहिती द्यायची आहे. विशिष्ट विद्यार्थी अथवा विद्यार्थिनी कुठे स्थलांतरित झाली ते ट्रॅकिंगद्वारे शोधून काढले जाईल. असा स्थलांतरित विद्यार्थी पुन्हा शाळेत आणणे ही तो वास्तव्य करीत असलेल्या ठिकाणी असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकाची जबाबदारी असेल. त्या विद्यार्थ्याचे पालक ज्या कंत्राटदाराकडे काम करीत असतील त्याचा क्रमांक मुख्याध्यापकांना देऊन विद्यार्थ्याला शाळेत आणण्याकरिता प्रयत्न केले जातील, अशी माहिती राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी दिली.
अनेकदा स्थलांतर करताना अशी कागदपत्रे या कुटुंबाकडून गहाळ झाल्याने त्यांच्या मुलांना शाळेत पुढील इयत्तेत प्रवेश मिळत नव्हता. शिक्षण हमीपत्र दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती संगणकात नोंदली गेलेली असल्याने राज्यात कुठेही बसून त्याची पडताळणी करता येणार आहे.

Web Title: Main stream to bring immigrant students