महेश मोतेवार ओडिशा पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: January 4, 2016 03:17 IST2016-01-04T03:17:27+5:302016-01-04T03:17:27+5:30
समृद्ध जीवन फुड्स कंपनीचा प्रमुख महेश किसन मोतेवार याला रविवारी सकाळी ओडिशा पोलिसांनी ताब्यात घेतले.

महेश मोतेवार ओडिशा पोलिसांच्या ताब्यात
उस्मानाबाद : समृद्ध जीवन फुड्स कंपनीचा प्रमुख महेश किसन मोतेवार याला रविवारी सकाळी ओडिशा पोलिसांनी ताब्यात घेतले. तत्पूर्वी पुण्याहून आल्यानंतर त्याला शनिवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास उमरगा न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले़
न्यायालयाच्या आदेशानुसार मोतेवार याला उस्मानाबाद येथील कारागृहात आणण्यात आले होते़ कारागृहातून ओडिशा पोलिसांनी मोतेवारला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे़ मोतेवारच्या जामीन अर्जावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे़
उमरगा तालुक्यातील येणेगूर येथील रेवते अॅग्रोच्या डेअरीतील फसवणूक प्रकरणात मोतेवारला उस्मानाबाद पोलिसांनी २८ डिसेंबर रोजी पुणे येथून ताब्यात घेतले होते़ छातीत दुखू लागल्याने ३० डिसेंबर रोजी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ दुसऱ्या दिवशी सोलापूरला आणि नंतर पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते़ शनिवारी मोतेवारला ‘डिस्चार्ज’ मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला रात्री उस्मानाबादेत आणले.