संतोष भिसेसांगली : राज्य शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजनांना निधीची चणचण भासत असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. काही योजना बंद करण्याच्या हालचालीही शासकीय स्तरावर सुरू आहेत. सामान्य रुग्णांसाठी वरदायी ठरलेली महात्मा फुले जनआरोग्य योजनाही निधीटंचाईच्या गर्तेत सापडली आहे. या योजनेतून उपचार करणाऱ्या राज्यभरातील रुग्णालयांना जुलै २०२४ पासून छदामही मिळालेला नाही. या योजनेत समाविष्ट असलेल्या १ हजार ६६० रुग्णालयांची थकबाकी ८८९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या शनिवारपर्यंतची ही स्थिती आहे.
ही बातमी प्रसिद्ध होईपर्यंत थकबाकीचा आकडा हजार कोटींपर्यंत गेलेला असेल. सर्व गटांतील रुग्णांना कॅशलेस उपचार देणारी ही योजना गरजू रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे. १,३६५ प्रकारच्या आजारांवर या योजनेतून अगदी मोफत उपचार केले जातात. शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार रुग्णालयांना परतावा मिळतो; पण गेल्या जुलै महिन्यापासून रुग्णालयांना पैसे मिळालेले नाहीत. सामान्यत: दीड ते दोन महिन्यांत पैसे अदा होतात; पण सध्या मात्र सात महिने झाले तरी पैशांची प्रतीक्षा संपलेली नाही. परतावा मिळावा म्हणून रुग्णालये शासनाकडे पाठपुरावा करत आहेत.परतावा मिळालेला नसला, तरी रुग्णालयांनी रुग्ण दाखल करून घेणे थांबविलेले नाही, ही बाब दिलासादायक ठरली आहे. मात्र, तशी परिस्थिती कधीही निर्माण होण्याची भीती आहे. छोट्या शहरांतील रुग्णालयांची मोठी थकबाकी पेलण्याइतपत क्षमता नसल्याने त्यांचा आर्थिक गाडा कोलमडू पाहत आहे.
रुग्णांना त्रासपरतावा मिळाला नसल्याने मेटाकुटीला आलेल्या रुग्णालयांकडून उपचारांचे काही साहित्य व औषधी रुग्णांनाच आणण्यास सांगितले जात आहे. यातून रुग्णांना भुर्दंड सोसावा लागत आहे. शासकीय रुग्णालयात मात्र अशी स्थिती नाही.
- योजनेतील राज्यभरातील रुग्णालये - १,६६१
- जुलै २०२४ पासून थकबाकी - ८८९ कोटी रुपये
- सांगली जिल्ह्यातील रुग्णालये - ६०
- जुलै २०२४ पासून थकबाकी - ३६ कोटी
सर्व जिल्ह्यांची थकबाकी अशी
- अहिल्यानगर : ५५.३४
- अकोला : १९.३७
- अमरावती : २५.२२
- बीड : १०.४६
- भंडारा : २.३१
- बुलडाणा : १२.८२
- चंद्रपूर : ३.६५ कोटी
- छत्रपती संभाजीनगर : ७७.२६
- धाराशिव : ४.१८
- धुळे : २५.१८
- गडचिरोली : ३६ लाख
- गोंदिया : ३.८२
- हिंगोली : १.२१ कोटी
- जळगाव : २८.६३
- जालना : १७.१३
- कोल्हापूर : ५३.२९
- लातूर : १३.४६
- मुंबई आणि उपनगरे : ६८.२९
- नागपूर : ५५.४७
- नांदेड : २१.६९
- नंदुरबार : २.८७
- नाशिक : ९०.७४
- पालघर : ३.३०
- परभणी : २.७५
- पुणे : ६५.५४
- रायगड : १४.४७
- रत्नागिरी : १०.५६
- सातारा : २५.४१
- सिंधुदुर्ग : ३.०२
- सोलापूर : ४२.५०
- ठाणे : ५६.६२
- वर्धा : २१.८७
- वाशिम : ७.७८
- यवतमाळ : ७.७१
- एकूण : ८८९.९७