महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही - नरेंद्र मोदी
By Admin | Updated: October 7, 2014 12:39 IST2014-10-07T11:52:12+5:302014-10-07T12:39:32+5:30
शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाराष्ट्राचे तुकडे पाडणारा अद्याप जन्माला आला नसून दिल्लीत सत्तेवर असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही - नरेंद्र मोदी
ऑनलाइन लोकमत
सिंदखेड (धुळे), दि. ७ - शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाराष्ट्राचे तुकडे पाडणारा अद्याप जन्माला आला नसून दिल्लीत सत्तेवर असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. मुंबईशिवाय महाराष्ट्र अपूर्ण असून देशाला पुढे नेण्याची ताकद फक्त महाराष्ट्रातच आहे असे मोदींनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी धुळे येथील सिंदखेडमध्ये प्रचारसभा घेतली. या सभेत मोदींनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजपची सत्ता आल्यास राज्याचे तुकडे पडतील अशी भिती काँग्रेसपासून ते शिवसेना, मनसे या पक्षांनी व्यक्त केली आहे.यावर उत्तर देताना मोदी म्हणाले, निवडणुकीचा ज्वर चढू लागताच काही मंडळी वाटेल ते बोलू लागलेत. दिल्लीत सत्तेवर असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. मोदींनी मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य घटक असल्याचे स्पष्ट केले असले तरी स्वतंत्र विदर्भाविषयी भूमिका जाहीर करणे त्यांनी टाळले आहे.
मी जनतेचा प्रधान सेवक असून ५ वर्षांनंतर तुम्हाला आमच्या सरकारच्या प्रत्येक कामाचा हिशोब देऊ असा पुनरुच्चारही मोदींनी केला. कापूस व कांदा उत्पादक शेतक-यांवर अन्याय होऊ देणार नाही. शेतक-यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या सत्ताधा-यांना १५ ऑक्टोबररोजी मतदान करुन शिक्षा द्या असे आवाहन त्यांनी केली.