महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही!

By Admin | Updated: August 2, 2016 05:40 IST2016-08-02T05:40:23+5:302016-08-02T05:40:23+5:30

१०५ हुतात्मांच्या बलिदानानंतर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे.

Maharashtra will not let the pieces fall! | महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही!

महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही!


मुंबई : १०५ हुतात्मांच्या बलिदानानंतर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे. तुमच्या राजकीय स्वार्थासाठी या राज्याचे तुकडे पडू देणार नाही, अशा शब्दात शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकारला ठणकावले. महाराष्ट्र अखंडच राहील, असा ठराव आणण्याची मागणी करत विरोधकांनी विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले.
सकाळी कामकाज सुरू होताच, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व काँग्रेस नेते नारायण राणे यांनी अखंड महाराष्ट्राचा मुद्यावर स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. आज अण्णाभाऊ साठे यांची ९६वी जयंती आहे. आपल्या साहित्यातून त्यांनी अखंड महाराष्ट्राची ज्योत तेवत ठेवली. पोवाडे रचले, चळवळ उभी केली. सुमारे ४६ हजार जणांनी अखंड महाराष्ट्रासाठी तुरुंगवास पत्करला. त्यामुळे अखंड महाराष्ट्रावर सरकारची भूमिका
स्पष्ट झाली पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी केली.
लोकसभेत भाजपाच्या एका खासदाराने वेगळ्या विदर्भाचा ठराव आणला. त्याला राज्यातील एका मंत्र्यानेही पाठिंबा दिला. या मंत्र्यांनी अखंड महाराष्ट्राची शपथ घेतली आहे, विदर्भाची नाही. त्यामुळे राज्य तोडण्याआधी सत्तेतून बाहेर पडा, असा इशाराही मुंडे यांनी दिला.
त्यानंतर, विरोधी बाकांवरील सदस्यांनी सभापतींसमोरील हौदात जमा होत घोषणाबाजी केली. त्यामुळे कामकाज तहकूब करावे लागले. कामकाज पुन्हा सुरू झाले, तेव्हा राणे यांनी विभाजन हवे असेल, तर आधी सत्तेतून बाहेर पडा आणि मैदानात या, असे आव्हान भाजपाला दिले. मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत. त्यांनी विदर्भाचा विकास जरूर करावा. विदर्भातील जनतेलाही विभाजन नव्हे, तर विकास हवा आहे, परंतु मुख्यमंत्र्यांची भूमिकाही विभाजनाची असेल, तर त्यांनी आधी राजीनामा द्यावा, अशी मागणी राणे यांनी
केली. (प्रतिनिधी)
>ठराव मंजूर करा ! : नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘राजकीय इच्छाशक्ती दाखवत सभागृहात अखंड महाराष्ट्राचा ठराव एकमताने मंजूर करण्यात यावा. भाजपा नेते उलटसुलट विधाने करून चुकीचा संदेश पसवत आहेत.’

Web Title: Maharashtra will not let the pieces fall!