भारतीय भाषांचं साहित्य संमेलन भरवण्यासाठी महाराष्ट्रानं पुढाकार घ्यावा - गुलजार
By Admin | Updated: January 16, 2016 13:27 IST2016-01-16T13:25:08+5:302016-01-16T13:27:11+5:30
भारतातल्या सगळ्या भाषांचं एकत्र संमेलन व्हायला हवं अशी अपेक्षा करताना याकामी महाराष्ट्रानेच पुढाकार घ्यायला हवा असे आवाहनही गुलजार यांनी केलं.

भारतीय भाषांचं साहित्य संमेलन भरवण्यासाठी महाराष्ट्रानं पुढाकार घ्यावा - गुलजार
>ऑनलाइन लोकमत
ग्यानबा तुकाराम नगरी (पिंपरी चिंचवड) दि. १६ - साहित्य संमेलनं भरवणं, लेखकांनी, कवींनी, कलाकारांनी एकत्र येणं आणि वैचारीक देवाणघेवाण करणं ही केवळ महाराष्ट्रात घडणारी गोष्ट असल्याची कौतुकाची थाप ज्येष्ठ कवी गुलजार यांनी ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना दिली. तसेच भारतातल्या सगळ्या भाषांचं एकत्र संमेलन व्हायला हवं अशी अपेक्षा करताना याकामी महाराष्ट्रानेच पुढाकार घ्यायला हवा असे आवाहनही गुलजार यांनी केलं.
मराठीतील उत्तमोत्तम साहित्य अन्य भाषांमध्ये अनुवादीत होत असल्याचे सांगताना अन्य भाषांमधील साहित्यही मराठीत येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज यांच्यामुळे मी मराठीच्या जवळ आल्याचे सांगताना मराठीतल्या अनेक उत्तमोत्तम कलाकृती अरूण शेवते यांच्या मदतीने मी उर्दूत व हिंदीत अनुवादीत केल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.
लेखक हा मुक्त असतो, तो कुणाच्याही दबावापुढे झुकत नाही आणि त्यानं बंडखोरच रहावं असं गुलजार म्हणाले. ब्रह्मांडाचा आवाज एकवेळ गप्प होऊ शकतो, परंतु लेखकाचा नाही असं गुलजार म्हणाले. यासंदर्भात त्यांनी लेखकाची जीभ कापली तरी तो खोकल्यावर शब्दच बाहेर पडतात, त्यामुळे त्याची वाचा तुम्ही कधीही बंद करू शकत नाही या आशयाची कविता ऐकवली आणि उपस्थितांची मने जिंकली.