सातारा जिल्ह्यात जून महिन्यात धो-धो कोसळणाऱ्या पावसाने जुलै महिन्यात काही प्रमाणात ब्रेक लावला. त्यामुळे दोन महिन्याच्या सरासरीच्या अवघा ८६ टक्केच पाऊस पडला. सरासरी ४३१ मिलीमीटर पर्जन्यमान झाले. यामध्ये सातारा, पाटण, कोरेगाव, खटाव, माण, फलटण, महाबळेश्वर या तालुक्यात पाऊस कमी पडला. तर इतर तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले.
सातारा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात मान्सूनचा पाऊस पडतो. जिल्ह्याची वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ८८६.२ मिलीमीटर आहे. यातील जून आणि जुलै या महिन्यात सरासरी ५०१ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो. त्यानंतर उर्वरित दोन महिन्यात पाऊस वार्षिक सरासरी गाठेल असा अंदाज असतो. पण, मागील काही वर्षांपासून पावसाचे गणितच बिघडले आहे. कोणत्याही महिन्यात जादा पाऊस होतो. तर धो-धो पाऊस पडत असतो त्यावेळी ब्रेक लागतो. यावर्षी हे प्रकर्षाने समोर आलेले आहे. कारण, मे महिन्याच्या उत्तरार्धात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे दुष्काळी तालुक्यातील तलाव भरले. त्यानंतर जून महिन्यातही अधिक पाऊस झाला. मात्र, जुलै महिन्यात सुरूवातीला चांगला, मध्यंतरी उघडीप आणि शेवटी दमदार असा पाऊस पडला. तरीही यावर्षी जुलै महिन्यात पाऊस कमी झाला आहे.
जून आणि जुलै या दोन महिन्यात सरासरी ५०१ मिलीमीटर पाऊस पडतो. पण, यावर्षी ४३१.८ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. हे प्रमाण ८६.१ टक्के आहे. दोन महिन्यांचा विचार करता बहुतांशी तालुक्यात पावसात तूट आहे. जावळी तालुक्यात दोन महिन्यात १२१ टक्के पर्जन्यमान झाले. तर कऱ्हाड तालुक्यात १०२, खंडाळा १०७ टक्के, वाईत ११९ टक्के पाऊस झालेला आहे. तर सातारा तालुक्यात दोन महिन्याच्या तुलनेत अवघा ८७ टक्के पाऊस पडला आहे. पाटण तालुक्यात प्रमाण एकदम कमी राहिले. अवघा ६०.५ टक्के पाऊस झाला. कोरेगाव तालुक्यात ७६ टक्के, खटाव ९७, माणला ८७, फलटण ८३ आणि महाबळेश्वर तालुक्यात ६३.५ टक्के पाऊस पडलेला आहे. दोन महिन्यात सुमारे १४ टक्के पावसात तूट आहे. आता उर्वरित दोन महिन्यात पाऊस वार्षिक सरासरी म्हणजे ८८६ मिलीमीटरचा टप्पा गाठेल असा अंदाज आहे.
मगाीलवर्षी १४४ टक्के अधिक पाऊस...मागीलवर्षी जून महिन्यात पाऊस होताच. पण, जुलै महिन्यात मुसळधार आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला. त्यामुळे जून आणि जुलै या दोन महिन्यात १४४ टक्के पाऊस झाला होता. तब्बल ७३५ मिलीमीटर पर्जन्यमान झालेले. त्यामुळे पुढील ही दोन महिन्यातही जादा पाऊस झाल्याने वार्षिक सरासरीच्या १२५ टक्के पाऊस पडला होता.
जिल्ह्यातील दोन महिन्यातील पाऊस (मिलीमीटरमध्ये)
सातारा- ३९३जावळी- १,०१३पाटण- ५९९कऱ्हाड- ३४३कोरेगाव- २६९खटाव- १८४माण- १४८फलटण- १२८खंडाळा- २१५वाई- ४७८महाबळेश्वर- १,९७६
जूनमध्ये १२६ टक्के पाऊसजिल्ह्यात यावर्षी जूनच्या मध्यावर पाऊस सुरू झाला होता. तरीही जून या महिन्यात सरासरीच्या १२६ टक्के पाऊस झाला. एकूण २४५ मिलीमीटर पाऊस पडला. यामध्ये जावळी तालुक्यात तब्बल ३२३.७ मिलीमीटर पर्जन्यमान झाले होते. तर माण, फलटण आणि महाबळेश्वर या तीन तालुक्यात सरासरीच्या कमी पाऊस झाला. दरम्यान, जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी १९४.१ मिलीमीटर पाऊस पडतो.