Maharashtra Politics ( Marathi News ) : धनंजय मुंडे यांनी गुरुवारी (३० जानेवारी) भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. या भेटीनंतर नामदेव शास्त्री यांनी मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे हा खंडणी घेणारा माणूस नाही असं भाष्य केले. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
“धनंजय मुंडेंना भगवान गडाचा आधार का घ्यावा लागतो, पक्षावर विश्वास नाही का”: बजरंग सोनावणे
धनंजय मुंडे यांच्या पाठिशी भगवान गड आहे असं विधान नामदेव शास्त्री यांनी केले, यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, आम्हाला हे पटत नाही. हे अपेक्षित नाही. यावर आज शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. शिरसाट म्हणाले, धनंजय मुंडे भगवान गडावर गेले हे चांगलच आहे. एखाद्या संतांच्या सानिध्यात जाणे याचा राजकीय संबंध लावणे काही कारण नाही,कोण भगवान गडावर गेले, कुणी कुठेही गेले यावर आक्षप घेणे चुकीचे आहे, असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले.
यावेळी मंत्री संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शिरसाट म्हणाले, ज्या लोकांनी मुंबईची वाट लावली ते लोक आज भ्रष्टाचारावर बोलत आहेत. सत्ता भोगताना जे घोटाळे केले आहेत. त्याचे आता पुरावे समोर येत आहेत, असंही शिरसाट म्हणाले. सगळे सामंत आमच्यासोबत आहेत. आता एकनाथ शिंदेंच ऑपरेशन करणार आहेत. या लोकांना लोकांच्या घरात पाहायची सवय लागली आहे. आम्हाला घरात बसून राजकारण करायचे नाही. बाहेर जाऊन काम करत आहे, असा टोलाही संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना लगावला.
पालकमंत्रिपदाचा तिढा राहिलेला नाही
पालतमंत्रिपदाबाबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले, पालकमंत्रिपदाचा तिढा आता राहिलेला नाही. ज्या दोन जागांवर तिढा सुरू आहे. त्यावर आज पडदा पडेल. पालकमंत्रिपदाच्या तिढ्यामुळे जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होतो हे म्हणणे चुकीचे आहे. विकासामध्ये कुठेही अडथळा येणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहे, असंही शिरसाट म्हणाले.