Maharashtra Politics ( Marathi News ) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अभिनेते महेश मांजरेकर यांनी काल राज ठाकरे यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे अप्रत्यक्षरीत्या युतीसाठी हात पुढे केला आहे. "कुठलीही मोठी गोष्ट डोळ्यासमोर ठेवली तर आमच्यातील वाद खूप किरकोळ आहे. त्यासमोर महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वावासाठी आमच्यातील वाद आणि बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं, या गोष्टी कठीण नाहीत, पण प्रश्न फक्त इच्छेचा आहे," असं राज ठाकरे म्हणाले आहेत. या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता खासदार शरद पवार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवार यांची विशेष मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये ठाकरे यांनी राज ठाकरे की उद्धव ठाकरे असा प्रश्न केला. या प्रश्नाला खासदार पवार यांनी दिलेले उत्तर ऐकून सभागृहात हशा पिकला होता, आता कालपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या मुलाखतीमध्ये राज ठाकरे शेवटचा प्रश्न राज की उद्धव? असा प्रश्न विचारला. यावेळी खासदार शरद पवार यांनी ठाकरे कुटुंबीय असं उत्तर दिले. या उत्तरानंतर सभागृहात जल्लोष सुरू झाला. या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी ठाकरे कुटुंबीय एकत्र हवे असे उत्तर दिले.
'...तर त्यांचं स्वागत आहे'
संजय राऊत म्हणाले, आता उद्धवजींनी सांगितले आहे. त्यांनी नम्रपणे सांगितले आहे. काही शक्ती महाराष्ट्राला पाण्यात पाहतात. मराठी माणसाचे नुकसान व्हावे यासाठी पडद्यामागून कारस्थान करतात. या लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नाही. अशा लोकांना आम्ही घरातही घेणार नाही, अशी भूमिका घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचे शत्रू , छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शत्रू हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. ही भूमिका जर कोणी घेत असेल तर त्यांचं स्वागत आहे आणि त्यांनतर आम्ही चर्चेला किंवा पुढचे जे काही म्हणणे आहे ते सांगू, असंही खासदार राऊत म्हणाले.