महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी सुरु आहेत. एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत रवाना झाले. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. या दोन्ही घडामोडींच्या टायमिंगवरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा दौरा केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या दौऱ्यात ते आपल्या पक्षाच्या सर्व खासदारांसोबत बैठक घेणार असून, या बैठकीत अधिवेशनात मांडावयाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या या अनपेक्षित दिल्ली भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या भेटीत फडणवीस यांनी राज्यपालांसोबत विविध विषयांवर चर्चा केली असल्याची माहिती आहे.
महायुती सरकारमध्ये सध्या सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र जरी दाखवण्यात येत असले तरी अंतर्गत नाराजीचे वातावरण जाणवत आहे. भाजपच्या काही आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असल्याची चर्चा आहे. आमदारांचा आरोप होता की, नगरविकास खात्याच्या निधीचे वाटप प्रामुख्याने केवळ शिवसेना संबंधित खात्यांनाच केले जात आहे. या तक्रारीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आणि यापुढे नगरविकास खात्याचा कोणाताही निधी देताना अंतिम स्वाक्षरीसाठी आपल्याकडे येईल, असे निर्देश दिले.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या काही निर्णयांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून, यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती चर्चेत आहे. तर शिंदेंनी घेतलेल्या काही निर्णयांना फडणवीस सरकारने ब्रेक दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असते.