Manikrao Kokate Dattatray Bharane, Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक गोष्टी घडताना पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान, आता मंत्रिमंडळात एक मोठा बदल घडून येणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्याचा पावसाळी अधिवेशनाच्या वेळी सभागृहात मोबाईलवर पत्त्त्यांचा रमी गेम खेळणारे कृषिमंत्रीमाणिकराव कोकाटे यांना त्याच्या मंत्रिपदावरून काढून दुसरे खाते देण्यात येणार आहे. माणिकराव कोकाटे यांना क्रीडामंत्रीपदाचा पदभार दिला जाणार असल्याची चर्चा आहे. तर माणिकराव कोकाटे यांच्याजागी दत्तात्रेय भरणे यांची कृषिमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
खात्यांची आदलाबदल होणार
माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रीपदाची आतपर्यंतची कारकीर्द खूपच वादग्रस्त आहे. त्यांनी केलेल्या अनेक विधानांमुळे वाद निर्माण झाला होता. तशातच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडल्या जाणाऱ्या विधीमंडळात महत्त्वाची चर्चा सुरू असताना, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी गेम खेळत बसले होते. त्याचा व्हिडीओ राजकीय वर्तुळात व्हायरल झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावरून माणिकराव कोकाटेंवर टीकेची झोड उठली. तेव्हापासून कोकाटे यांना पदावरून दूर करा, अशा मागणी जोर धरू लागली होती. या प्रसंगी विविध नेतेमंडळींच्या बैठका झाल्या असून आता कोकाटे यांचे खातेबदल होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.
खातेबदलाचं पत्र मुख्यमंत्र्यांकडे...
माणिकराव कोकाटे यांचे कृषिखाते आता दत्ता भरणे यांच्याकडे देण्यात येणार आहे. तर दत्ता भरणे यांचे क्रीडा खाते कोकाटेंना देण्यात येणार आहे, असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले असल्याचीही माहिती मिळाली आहे.
अजित पवारांकडून कोकाटेंची कानउघाडणी
विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती. गेल्या काही दिवसात या मागणीने जोर धरला होता. पण त्यामुळे त्यांचे मंत्रिपद जाण्याची वेळ आली होती. पण सध्या त्यांना अभय दिले आहे. मात्र, यापुढे वागण्या-बोलण्याबाबत एकही चूक घडल्यास मंत्रिपद विसरा, असा सज्जड दम अजित पवारांनी कोकाटेंना दिल्याचे समजते. अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या अँटिचेम्बरमध्ये बोलविले आणि दहा मिनिटे त्यांची शाळा घेतली. वादग्रस्त विधाने, पत्ते खेळणे असले प्रकार एका मंत्र्याला शोभणारे नाहीत. तुम्ही बडबड सुरूच ठेवली आहे, हे बरोबर नाही. सांगूनही तुम्ही ऐकत नाही याचा अर्थ तुम्हाला पक्षनेतृत्वाचाही धाक नाही, असा त्याचा अर्थ होतो. खरेतर तुमचे मंत्रिपदच काढायला हवे; पण आपले ज्येष्ठत्व लक्षात घेऊन तूर्तास अभय दिले जात आहे, अशा कडक शब्दांत अजित पवार यांनी कोकाटेंची कानउघाडणी केल्याचे समजते.